“आता ठाकरेंच्या उमेदवारांना कोणी मत देणार नाही, उद्धवसेनेतील अनेक जण भाजपात येण्यास इच्छूक”
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:29 IST2025-04-03T17:28:33+5:302025-04-03T17:29:05+5:30
BJP Chandrashekhar Bawankule News: वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरील भूमिकेवरून ठाकरेंकडील हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते पक्ष सोडून जाण्याच्या मानसिकतेत असून, आगामी काही दिवसांत अनेक जण भाजपात प्रवेश करून शकतात, असा दावा करण्यात आला आहे.

“आता ठाकरेंच्या उमेदवारांना कोणी मत देणार नाही, उद्धवसेनेतील अनेक जण भाजपात येण्यास इच्छूक”
BJP Chandrashekhar Bawankule News: बुधवारचा दिवस वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून चांगलाच गाजला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी केवळ यावर राजकीय मते व्यक्त केली नाही, तर सुधारणा विधेयकावर लोकसभेत विस्तृत चर्चा झाली. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आपापले म्हणणे मांडले. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत दीर्घ चर्चेनंतर मध्यरात्री मतदानाने पारित करण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ एवढी मते पडली. यानंतर आता उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर भाजपा नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर पलटवार केला जात आहे.
जर हिंदूत्ववादी असाल तर भाजपाने त्यांच्या झेंड्यावरील हिरवा रंग काढावा. फटाक्यांची वात पेटवायची आणि पळून जायचे ही भाजपाची वृत्ती आहे. त्याला आम्ही विरोध केला. वक्फच्या जमिनी बळकावून त्यांच्या व्यापारी मित्रांना दिल्या जाणार त्याचा आम्ही विरोध केला आहे. भाजपाचे नेते अमित शाह, किरेन रिजिजू, टीडीपी, जेडीयू यांनी ज्याप्रकारे मुस्लीम समाजाची भूमिका मांडली. गरीब मुस्लिमांसाठी हे विधेयक आणले. मराठीत त्याला लांगुनचालन म्हणतात तेच तुम्ही करत होता. तोडा, फोडा आणि राज्य करा ही भाजपाचे धोरण आहे. वक्फ सुधारणा विधेयक जर मुस्लिमांच्या हिताचे आहे तर हिंदुत्व आम्ही सोडले की तुम्ही सोडले? उद्या हिंदू देवस्थानावर गैर हिंदू लादला तर ते आम्ही सहन करू का? तर नाही. तसेच वक्फ बोर्डावर गैर मुस्लीम ते कसे सहन करतील, असे सांगत उद्धव ठाकरेंनी टीका केली. याला भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आता ठाकरेंच्या उमेदवारांना कोणी मत देणार नाही
पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे व त्यांच्या खासदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षातील कार्यकर्ते व शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. त्यांच्या खासदारांनी वक्फ सुधारणा विधेयकाचा विरोध करून महाराष्ट्राचा व देशाचा अपमान केला आहे. त्यामुळे जनता उद्धव ठाकरेंना माफ करणार नाही. ज्या लोकांनी त्यांचे खासदार निवडून दिले त्यांना आता वाईट वाटत असेल की, आता आपली चूक झाली, आपण उगाच उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे जनता आता उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांना निवडून देणार नाही. कारण त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केला आहे, असा दावा बावनकुळे यांनी केला.
ठाकरेंकडील हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते पक्ष सोडून जाण्याच्या मानसिकतेत
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव ठाकरे यांनी सोडले आहेत. त्यांनी काँग्रेसचे विचार मान्य केल्याचा हा आणखी एक पुरावा आहे. मतांसाठी ते काही लोकांचे लांगुलचालन करत आहेत. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, विशिष्ट समाजाचा विचार करून त्यांच्या खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते, त्यांचे शिवसैनिक शिवसेना सोडून जाण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यासंदर्भात मला कालपासून फोन येत आहेत. आजही अनेक मेसेज आले आहेत. मला भाजपात पक्ष प्रवेश घ्यायचा आहे अशी विचारणा होत आहे. आगामी काळात अनेक जण पक्षप्रवेश करू शकतात, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.