Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंना आमदार सोडून जाऊ शकतात, तर मविआ काळात उद्योजक राज्याबाहेर का जाणार नाहीत?”
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 05:42 PM2022-11-13T17:42:24+5:302022-11-13T17:43:21+5:30
Maharashtra News: उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. पण सगळा वेळ काँग्रेस आणि शरद पवार यांना सांभाळण्यात गेला, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे.
Maharashtra Politics: एकामागून एक शिवसेना उद्धव ठाकरे गटातील नेते, पदाधिकारी पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहेत. एका बाजूला ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष वाढताना दिसत असून, दुसऱ्या बाजूला राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पांवरून महाविकास आघाडीचे नेते आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार यांच्यात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. यातच उद्धव ठाकरेंना आमदार सोडून जाऊ शकतात, तर मविआ काळात उद्योजक राज्याबाहेर का जाणार नाहीत, असा थेट सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. पण त्यांचा सर्व काळ काँग्रेस आणि शरद पवार यांना सांभाळण्यात गेला. त्यांना उद्योजकांशी काही घेणेदेणे नव्हते. उद्धव ठाकरे बोलत नव्हते म्हणून त्यांना आमदार सोडून गेले. जर त्यांना आमदार सोडून जाऊन शकतात तर त्यांच्या काळात उद्योजक का सोडून जाऊ शकत नाहीत, अशी विचारणा बावनकुळे यांनी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
उद्धव ठाकरे १८ महिने मंत्रालयात फिरकलेच नाहीत
महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळातील चुकांमुळे औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले. राज्यात कोणताही उद्योग आणायचा असेल गुंतवणूक होऊ द्यायची असेल तर उद्योजकांशी बोलावे लागते. बैठका घ्याव्या लागतात. पण त्यासाठी मुख्यमंत्री उपलब्ध हवेत ना? उद्धव ठाकरे १८ महिने मंत्रालयात फिरकलेच नाहीत. सचिवांनाही मुख्यमंत्र्यांची भेट मिळण्यासाठी वाट पाहावी लागायची. तिथे उद्योग कसे येणार, अशी विचारणा बावनकुळे यांनी केली.
दरम्यान, उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विचार घेऊन पक्ष चालवत आहेत. त्यावरून आगामी काळात उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर चार लोकांशिवाय कोणी दिसणार नाही. ही स्थिती येणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ म्हणजे शिवसेना आणि तुमचा विचार उद्ध्वस्त करणारा आहे. विचार उद्ध्वस्त करून त्यांनी काँग्रेसची साथ पत्करली आहे. त्यांनी आपल्या पक्ष आणि बाळासाहेबांच्या विचारांना मुठमाती दिली, अशी घणाघाती टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"