“बारामतीत महायुतीचा विजय सर्वांत मोठा असेल, तुतारी असलेली NCP संपतेय”; चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 09:44 PM2024-02-23T21:44:21+5:302024-02-23T21:44:39+5:30
BJP Chandrashekhar Bawankule News: ही लोकसभा निवडणूक मोदी गॅरंटीवर होणार आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
BJP Chandrashekhar Bawankule News: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसून तयारीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीतील दुरावा काही अंशी संपताना दिसतोय, तर राज्यातील महाविकास आघाडी मजबूत असल्याचे म्हटले जात आहे. यातच बारामती लोकसभा जागेवर राज्याचे लक्ष असल्याचे दिसत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे विधान केले आहे. बारामतीतील महायुतीचा विजय हा राज्यातील सर्वात मोठा विजय ठरेल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
मीडियाशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, तुतारी चिन्ह असणाऱ्या राष्ट्रवादीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दररोज पक्षप्रवेश होत आहेत. त्यामुळे तुतारी असणारी राष्ट्रवादी संपत चालली आहे. त्यांना चिन्ह मिळाले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. परंतु, ही लोकसभा निवडणूक मोदी गॅरंटीवर होणार आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
बारामतीचा विजय महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा विजय ठरेल
लोकसभा जागाबाबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि केंद्रीय नेतृत्व बैठक घेऊन ठरवेल. जागा ठरल्यानंतर त्या निवडून आणण्याचा प्रयत्न महायुतीचे सगळे पक्ष करतील. बारामतीमध्ये अजित पवार जो उमेदवार देतील तोच अंतिम असेल आणि त्या उमेदवाराला ६० टक्के पेक्षा जास्त मते मिळतील. बारामतीचा विजय महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा विजय ठरेल, असा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने हे चिन्ह शरद पवार गटाला बहाल केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने या चिन्हाचे स्वागत केले असून, विरोधक मात्र शरद पवार गटावर टीका करताना दिसत आहेत. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ला मिळालेल्या ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या पक्ष चिन्हाचा अनावरण सोहळा किल्ले रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे, असे शरद पवार गटाने जाहीर केले आहे.