उदय सामंत-राज ठाकरे भेट, भाजपा नेत्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ते सर्वांचे मित्र...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 12:57 IST2025-02-22T12:56:33+5:302025-02-22T12:57:08+5:30
BJP Chandrashekhar Bawankule News: उदय सामंत यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

उदय सामंत-राज ठाकरे भेट, भाजपा नेत्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ते सर्वांचे मित्र...”
BJP Chandrashekhar Bawankule News: बीड, परभणी मुद्द्यांवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे नेत्यांच्या गाठी-भेटी वाढताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, चर्चांना सुरुवात झाली आहे.
आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी पुन्हा महायुती नेत्यांची राज ठाकरेंसोबत जवळीक वाढली आहे. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज यांच्या भेटीला त्यांच्या घरी गेले होते. यानंतर आता शिंदेसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जात मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. पुण्यात मराठी भाषिकांच्या संमेलनाला उपस्थित राहण्याची विनंती राज ठाकरेंना केली होती. त्या विनंतीला मान देऊन त्यांनी संमेलनाला हजेरी लावली. त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी भेट घेतली. मराठी भाषेबाबत आमच्यात चर्चा झाली. दिल्लीत मराठी साहित्य संमेलन सुरू आहे त्याबद्दल चर्चा झाली. राजकीय चर्चा झाली नाही. या भेटीला राजकीय स्पर्श करू नये. ही अतिशय साधी आणि सहज भेट होती, असे उदय सामंत यांनी सांगितले. यावर भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे यांचे सर्वांची चांगले संबंध आहेत
पत्रकारांशी संवाद साधत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांना उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर, राज ठाकरे यांचे सर्वांची चांगले संबंध आहेत. ते सर्वांचे मित्र आहे. त्यामुळे अशा किती होत असतात, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. तसेच प्रत्येक गोष्ट ही राजकारणाच्या चष्म्यातून बघितली पाहिजे असे नाही, काही गोष्टी या राजकारणाच्या पलीकडे असतात. ही फक्त सदिच्छा भेट होती. एकमेकांच्या घरी जाऊन आपण लोकांना भेटतो, ही महाराष्ट्राची परंपरा आहे, त्याचप्रमाणे ही भेट झाली, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राज ठाकरेंच्या भाषणाची शैली आणि त्यांचे वकृत्व वेगळे आहे. राज ठाकरे असे व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यासोबत राजकारणापलीकडे जाऊन गप्पा मारल्या तरी आपल्या ज्ञानात भर पडते. त्यामुळे ही भेट राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्रित युतीमध्ये येणार का हे माझ्यासाठी फार मोठा विषय आहे. एवढ्या पातळीवरील चर्चेत मी कधी पडलो नाही. माझ्या आवाक्यातील आणि झेपतील असे प्रश्न असतील तर मी त्याला उत्तर देऊ शकतो. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येणार असतील तर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली पाहिजे, असे उदय सामंत यांनी नमूद केले.