“२०२४ ला नरेंद्र मोदी तिसऱ्यांना पंतप्रधानपदाची शपथ घेतील”; चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 04:33 PM2023-11-25T16:33:41+5:302023-11-25T16:37:09+5:30
Chandrashekhar Bawankule News: पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजप असून, त्या नाराज नाहीत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
Chandrashekhar Bawankule News: लोकसभेच्या कामासाठी आलो आहे. सुपर वॉरियर्स लोकांच्या घरी जाऊन पंतप्रधान मोदींचे कार्य समजावून सांगतील. ज्यांना योजनांचा लाभ मिळाला नाही त्यांना योजनेचा लाभ कसा देता येईल ते बघणार आहोत. सन २०२४ मध्ये नरेंद्र मोदी तिसऱ्या वेळा पंतप्रधान पदाची शपथ घेतील. तसेच राज्यात महायुतीचे ४५ प्लस खासदार निवडून येतील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरू केली असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्यातील अनेक ठिकाणी दौरे करत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मकाऊ भेटीवरून संजय राऊतांनी टीका आणि आरोप केले. यावर बोलताना, वैयक्तिक जीवनात बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका फोटोमुळे कुणाची इमेज खराब करता येते असे एखाद्याला वाटत असेल तर ते शक्य नाही. हाँगकाँगला परिवारासोबत गेलो होतो. त्या ठिकाणी प्रत्येक हॉटेलमध्ये कॅसिनो असतो, त्याला क्रॉस करून जाताना कुणीतरी तो फोटो काढला, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
पंकजा मुंडे कुठेही नाराज नाहीत
गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. पंकजाताई मुंडे कुठेही नाराज नाहीत. पंकजा मुडे यांच्या नेतृत्वाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्या नाराजीने विरोधकांचा काही फायदा होईल असे अनेकांना वाटते. पण पंकजाताईंच्या रक्तारक्तात भाजप आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या कर्तृत्वाने उभा राहिलेला महाराष्ट्रात पंकजाताई कधीही नाराज राहू शकत नाहीत. खरे तर पक्ष मोठा आहे. पंकजाताई पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. निश्चितपणे पंकजा ताई महाराष्ट्रात आणि देशात चांगल्या लेव्हलला नेतृत्व करतील अशी अपेक्षा आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, वाचळवीरांनी औकतीत बोलावे, महाराष्ट्र संस्कारमय आहे, देव, देश, धर्म संस्कृती जपणारा आहे. इतर काही बोलण्यापेक्षा राज्याच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यासाठी बोलले पाहिजे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तसेच ५२७ वर्षांपासून राम मंदिराची वाट पाहिली जात आहे. ते स्वप्न पूर्ण झाले. मुस्लिम माहिलाही भाजपला मतदान करणार आहेत. याचे कारण त्यांचा संसार वाचवण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले आहे. महिला आनंदी आहेत, नवीन संसद भावनात पहिला कायदा महिलांना आरक्षण देण्याचे काम केले, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.