Maharashtra Politics: “केस संपलेली नाही, अनिल देशमुखांना फक्त जामीन मिळालाय”; भाजप नेत्याची सूचक प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 09:15 PM2022-12-12T21:15:19+5:302022-12-12T21:16:06+5:30
Maharashtra News: जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर अनिल देशमुखांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Maharashtra Politics: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अखेर जामीन मंजूर केला आहे. १ लाख रुपयांच्या जात मुचल्यावर देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावरून राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यातच केस संपलेली नाही, फक्त जामीन मिळालाय, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना पत्रकारांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना अनिल देशमुख यांना जामीन मिळाल्यासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर, न्यायालयाला जेव्हा जेव्हा वाटते तेव्हा तेव्हा निर्णय करते. अनिल देशमुखांच्या बाबतीत काही पुरावे होते. म्हणून त्यांना अटक झाली होती. आता न्यायालयालाने त्यांना जामीन दिलाय. पण, केस संपलेली नाही. फक्त जामीन मिळालाय, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
लोकसभेच्या ४५ जागा शिंदे व भाजप यांच्या समन्वयातून आम्ही जिंकणार
२०० पेक्षा अधिक विधानसभेच्या जागा याव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तसेच लोकसभेच्या ४५ जागा शिंदे व भाजपा यांच्या समन्वयातून आम्ही जिंकणार आहोत, असा विश्वास व्यक्त करताना, शिंदे गटाला सोबत घेऊनच आम्ही लोकसभा लढविणार आहोत. त्यांच्याकडे जागा आहे तर त्यांच्यासाठी भाजप ताकत लावणार आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्यांच्या जामीनाला आता १० दिवसांची स्थगिती मिळाली आहे. आम्हाला या जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागायची आहे त्यामुळे १० दिवस स्थगिती द्यावी अशी विनंती सीबीआयने उच्च न्यायालयाकडे केली. ही विनंती मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे १० दिवस तरी अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाहीत. पण उच्च न्यायालयाचा निकाल येताच अनिल देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"