Maharashtra Political Crisis: “मिटकरींना राष्ट्रवादीत काय अधिकार? आधी जयंत पाटलांशी बोलून घ्यावं”; भाजपचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 03:38 PM2022-08-29T15:38:55+5:302022-08-29T15:39:32+5:30
Maharashtra Political Crisis: जयंत पाटील आणि अमोल मिटकरींनी स्वतःच्या पक्षात नेमके काय सुरू आहे, हे आधी पाहावे, असे प्रत्युत्तर भाजपकडून देण्यात आले आहे.
Maharashtra Political Crisis: राज्यात भाजप सरकार आल्यापासून पुन्हा एकदा मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे यांची मंत्रिपदावर वर्णी लागावी अशी मागणी केली आहे. परंतु मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले. पंकजा मुंडे यांना सुरुवातीला विधान परिषद उमेदवारी आणि आता मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सातत्याने पुढे येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. यावरून भाजपने पलटवार केला असून, अमोल मिटकरींना राष्ट्रवादीने काय अधिकार दिले आहेत का, अशी थेट विचारणा करण्यात आली आहे.
भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीकडून देण्यात आलेल्या ऑफरबाबत प्रतिक्रिया देत अमोल मिटकरी आणि जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. अमोल मिटकरी यांच्याबाबत काय बोलणार? त्यांना त्यांच्या पक्षाने काय अधिकार दिले? पंकजा मुंडे आमच्या मोठ्या नेत्या आहेत. त्या कधीही राष्ट्रवादीत जाण्याचा विचार करू शकत नाही. मिटकरी यांच्या पक्षाचे पुढे काय होणार? याबाबत मिटकरी यांनी जयंत पाटील यांच्याशी बोलून घेतले पाहिजे, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.
राष्ट्रवादीत काय चाललेय, याकडे जयंत पाटलांनी पाहावे
जयंत पाटील यांनी सत्तेत असल्याच्या मानसिकतेतून बाहेर यावे, काही दिवस आराम करावा. आता महाविकास आघाडीत धुसफूस आहे, ते जयंत पाटील यांनी पाहावे. राष्ट्रवादीत काय चाललेय? याकडे जयंत पाटील यांनी लक्ष द्यावे, असा पलटवार बावनकुळे यांनी केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदारसंघात ९ केंद्रीय मंत्री ६ वेळा प्रवास करणार आहेत. शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्त्वात आम्ही ४८ मतदारसंघात काम करत आहोत. बारामती लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचा दौरा आहे. मी सुद्धा बारामती मतदारसंघात संघटन बांधणीचा दौरा करणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.