“शरद पवार गटाचा शपथनामा ही जनतेची फसवणूक”; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 04:36 PM2024-04-25T16:36:59+5:302024-04-25T16:37:13+5:30
Chandrashekhar Bawankule News: ‘शपथनामे’ जाहीर करुन काही होणार नाही, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
Chandrashekhar Bawankule News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामे प्रसिद्ध केले जात आहेत. भाजपा आणि काँग्रेस जाहीरनाम्यावरून एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्याला शपथपत्र असे नाव दिले आहे. या जाहीरनाम्यावरून भाजपाने शरद पवार गटावर हल्लाबोल केला आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना विविध विषयांवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले. उद्धव ठाकरे यांना दिवसा पंतप्रधान होण्याचे स्वप्न पडत आहे, त्यांनी महाराष्ट्रात १८ जागा जिंकून दाखवाव्या, असे आव्हान बावनकुळे यांनी दिले. एकनाथ खडसे यांनी भाजपामध्ये वापसी करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, अद्यापही त्याबाबत काही घडताना दिसत नाही. यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत केंद्रीय समिती निर्णय घेईल. केंद्रीय समितीने निर्णय केला असेल तर राज्यात आडकाठी केली जाणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
शरद पवार गटाचा शपथनामा ही जनतेची फसवणूक
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा ‘शपथनामा’ ही जगातील सर्वांत मोठी फसवणूक आहे. शरद पवार गटाने जाहीर केलेला ‘शपथनामा’ जनतेची दिशाभूल करणारा आहे. ‘शपथनामे’ जाहीर करुन त्यांना मत मिळणार नाही. भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जाहीर केलेला ‘वचननामा’ राष्ट्र कल्याणाचा आहे तर इंडिया आघाडीचा जाहीरनामा महाराष्ट्र विरोधी आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
दरम्यान, शरद पवार गटाच्या शपथनाम्यामधून शेतकरी, महिला, विद्यार्थी, तरुण, गरीब अशा समाजातील सर्व घटकांचा विचार करण्यात आल्याचे म्हटले आहे. सध्या गाजत असलेल्या आरक्षणाच्या प्रश्नासह, जातिनिहाय जनगणाना, महिलांना आरक्षण, शेतकऱ्यांची कर्जमाफी, तरुणांना पदवीनंतर एक वर्ष आर्थिक मदत, जीएसटीमध्ये सुधारणा, ५०० रुपयांपर्यंत गॅस सिलेंडर, पेट्रोल-डिझेलवरील कराबाबत फेरविचार, अशी अनेक आश्वासने या शपथनाम्यामधून देण्यात आली आहेत.