Maharashtra Politics: “तुमचे उरलेले दोन-चार जण वाचवा, नाहीतर शिंदे गट तेही घेऊन पळतील”; बावनकुळेंचा ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 04:55 PM2022-09-24T16:55:26+5:302022-09-24T16:56:20+5:30
Maharashtra News: अमित शाहांसमोर उद्धव ठाकरे म्हणजे सूर्यासमोर दिवा असून, त्यांचे नाव घेऊन बोलू नये, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. मात्र, यातच भाजपने पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खोचक शब्दांत टोला लगावला आहे. तुमचे उरलेले दोन-चार जण वाचवा, टिकवा. अन्यथा एकनाथ शिंदे यांचा गट तेही घेऊन पळतील, असे सांगत भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शिवसेना, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या जनआक्रोश मोर्चावर टीका केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिलदार नेते आहेत. ते माझे मित्र आहेत. त्यामुळे मला ते भेटले. उद्धव ठाकरेही आमचे मित्र होते. पण ते शरद पवारांच्या नादी लागले. उद्धव ठाकरेंबद्दल एक सांगतो. एक दिवस ते चारच लोक राहतील. माझे कुटुंब, माझी जबाबदारी अशी त्यांची अवस्था होईल. उद्धवजी, तुमचे उरलेले दोन चारजण वाचवा. नाही तर शिंदे साहेब तेही घेऊन पळतील. त्यामुळे टीका करणे सोडा, या शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
अमित शाहांसमोर उद्धव ठाकरे म्हणजे सूर्यासमोर दिवा
शिवसेनेला जन आक्रोश मोर्चा काढण्याचा अधिकार नाही. ते इव्हेंट मॅनेजमेट करत आहेत, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे. तसेच पंकजा मुंडे पक्षात नाराज नाही, असे सांगत उद्धव ठाकरे घाबरले आहेत. म्हणून मोठी भाषण सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी विचार करून बोलले पाहिजे. अमित शाह आणि उद्धव ठाकरे म्हणजे सूर्यासमोर दिवा आहे. त्यांचे नाव घेऊन बोलू नये, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
आम्ही शिंदे गटासोबतच युती करून निवडणूक लढणार आहोत
आम्ही शिंदे गटासोबतच युती करून निवडणूक लढणार आहोत, असे स्पष्ट करत एकनाथ शिंदे यांना पंतप्रधान भेटले की नाहीत यावर तेच उत्तर देतील, असे बावनकुळे यांनी सांगितले. समाजामध्ये विश्वास निर्माण करणे हे आमचे काम आहे. आम्ही विश्वास निर्माण करण्यासाठी हे करतोय. मुस्लिम समाज आमच्या सोबत आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी नमूद केले.