“हुकूमशाही प्रवृत्तीचे कोण आहे? हे उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या काळात राज्याने बघितले”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 06:09 PM2023-05-04T18:09:20+5:302023-05-04T18:10:30+5:30
Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले.
Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप-शिंदे गटातील आरोप-प्रत्यारोप तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहेत. बारसू रिफायनरीवरूनही दावे-प्रतिदावे केले जात आहेत. शरद पवार यांच्या निवृत्तीनंतर महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. यातच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.
बारसूमध्ये जाण्यापासून अडवण्याऐवजी तुम्ही लोकांमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्या. पालघरमध्ये घरात घुसून आदिवासींना बाहेर काढले जाते. ही कोणती लोकशाही आहे? म्हणून मी म्हटले की, मी मोदींच्या विरोधात नाही, या हुकुमशाही वृत्तीच्या विरोधात आहे, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते. याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच जय बजरंगबली नाऱ्यावरून उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर पलटवार केला.
मोदीजींना हुकूमशाही प्रवृत्तीचं म्हणण्याआधी थोडा आपला सत्तेचा कार्यकाळ आठवा
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धवजी हुकूमशाही प्रवृत्तीचे कोण आहे? तुमच्या अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात महाराष्ट्राने बघितले आहे. तुमच्या विरोधात टीका केली म्हणून नारायण राणे यांना तुरुंगात टाकले, त्याला हुकूमशाही म्हणतात. कार्टून फॉरवर्ड केले म्हणून निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण करणे, याला हुकूमशाही म्हणतात. तुमच्या विरोधात बोलले म्हणून पत्रकाराला घरातून अटक करणे याला हुकूमशाही म्हणतात. विरोधात भूमिका घेतली म्हणून अभिनेत्रीचे घर तोडणे याला हुकूमशाही म्हणतात. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना हुकूमशाही प्रवृत्तीचे म्हणण्याआधी थोडा आपला सत्तेचा कार्यकाळ आठवा, या शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना उत्तर दिले.
दरम्यान, राहिला प्रश्न ‘जय बजरंगबली’ नारा देण्याचा तर आम्हाला ‘जय श्रीराम’ आणि ‘जय बजरंगबली’ जयघोष करण्याचा अभिमान आहे. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्यापासून तुम्हाला मात्र हिंदुत्वाचा विसर पडला आहे. राम नवमी आणि हनुमान जन्मोत्सवाला तुम्ही साधे ट्विट करू शकला नाहीत. त्यामुळे तुम्हाला ‘जय बजरंग बली’चा नारा दिल्यावर दुःख वाटणे साहजिकच आहे. कारण तुम्ही आता जनाब ठाकरेंच्या भूमिकेत आहात, अशी बोचरी टीका बावनकुळे यांनी केली.