Maharashtra Politics: “देवेंद्र फडणवीस हेच यापुढे राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजे”: चंद्रशेखर बावनकुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 11:45 PM2022-09-11T23:45:52+5:302022-09-11T23:46:10+5:30
Maharashtra Politics: सन २०३५ मध्ये भारत विश्वगुरू होईल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
Maharashtra Politics: आताच्या घडीला आगामी २०२४ लोकसभा निवडणुकांसह राज्यातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर भाजपने लक्ष्य केंद्रीत केले असून, त्या पार्श्वभूमीवर रणनीति आखायला सुरुवात केली आहे. यातच भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध ठिकाणी दौरे करण्यास सुरुवात केली असून, शिवसेनेसह महाविकास आघाडीवर सडकून टीका करताना पाहायला मिळत आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस हेच यापुढे राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजे, असे बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले.
नाशिकमध्ये बोलताना, या राज्याचे अष्टपैलू कर्तृत्वान व्यक्ती देवेंद्र फडणवीस हे लोकनेते आहेत. त्यांनी माझ्या पाठीमागे राहून मला प्रचंड शक्ती आणि ऊर्जा दिली. त्यामुळे या राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी केले पाहिजे. देवेंद्र फडणवीस हेच यापुढे राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजे. जात धर्म, पंथाच्या बाहेर जाऊन निष्ठावंत कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांचे नेतृत्व आपण मानले पाहिजे. त्यांच्यामुळेच आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना मंत्रिपदं मिळाली, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
फार दिवस तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहू नका
यावेळी उपस्थित गजानन नाना शेलार यांना उद्देशून बोलताना बावनकुळे म्हणाले की, फार दिवस तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहू नका. तुमची गरज आम्हाला आहे, असे सांगत शेलार यांना भाजपत येण्याची ऑफर दिल्याचे सांगितले जात आहे. तसेच १९९२ मध्ये शाखेचा अध्यक्ष झालो. त्यावेळी सगळीकडे काँग्रेस पक्षाला स्थान होते. भाजपला अत्यंत कमी मते मिळत होती. भाजपने मला आमदार, मंत्री तसेच आता राज्याचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी दिली, असे बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे उंचीवरील नेते आहेत. माझे तिकीट कापले गेले. तेव्हा मला वाटले नव्हते की, मी पुन्हा आमदार होईन. राज्याचा नेता होईन. पण वरिष्ठ नेत्यांनी मला संधी दिली. भारतीय जनता पक्ष जगातील सर्वांत मोठा पक्ष आहे. सन २०३५ मध्ये जगातील सर्वांत तरुण पिढी भारतात असेल. सन २०२५ मध्ये भारत विश्वगुरू होईल, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.