"मंदिरं बंद ठेवून मदिरालय सुरू करणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता...", भाजपाची जहरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 12:19 PM2023-07-09T12:19:20+5:302023-07-09T12:19:54+5:30
"सत्तेत असताना जे मंत्रालयात गेले नाही ते आता विदर्भात येत आहेत, हा दौरा म्हणजे नौटंकी"
Uddhav Thackeray Vidarbha Visit: सध्याच्या राजकीय घडामोडी (Maharashtra Politics) आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात आज होणार आहे. दोन दिवसीय विदर्भ दौऱ्याने याचा प्रारंभ होत आहे. उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावरून भाजपाने त्यांच्यावर टीका केली आहे. सत्तेत असताना जे मंत्रालयात गेले नाहीत, ते आता विदर्भ दौरा करत आहेत, ही सारी नौटंकी आहे, असा शाब्दिक वार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केले. तसेच, आज उद्धव ठाकरे पोहरादेवीच्या दर्शनालाही जाणार आहेत. त्यावरूनही त्यांनी टोला लगावला.
"सत्ता असताना अडीच वर्षांत अडीच दिवस मंत्रालयात जाण्यासाठी ज्यांना वेळ मिळाला नाही ते उद्धव ठाकरे आता तब्बल दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना कधीही विदर्भातील जनतेची आठवण झाली नाही; आता मात्र विदर्भाचा पुळका आलेला दिसतोय. सत्तेवर असताना मंदिरं बंद ठेवून मदिरालय सुरू करणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता मंदिरांत दर्शनासाठी जावं लागतंय. उद्धव ठाकरे आता तुम्ही कितीही दौरे केले तरी तुमचं ढोंगी राजकारण आणि सत्ता गेल्यामुळे सुरू असलेली नौटंकी जनता ओळखून आहे. उद्धव ठाकरे तुम्ही विदर्भाच्या दौऱ्यावर आलाच आहात तर भाजपसोबत गद्दारी करून, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व सोडून तुम्हाला काय मिळालं हेही एकदा जनतेला सांगून टाका," असे ट्वीट करत बावनकुळे यांनी ठाकरेंवर टीका केली.
सत्ता असताना अडीच वर्षांत अडीच दिवस मंत्रालयात जाण्यासाठी ज्यांना वेळ मिळाला नाही ते उद्धव ठाकरे आता तब्बल दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना कधीही
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 9, 2023
विदर्भातील जनतेची आठवण झाली नाही; आता मात्र विदर्भाचा पुळका आलेला दिसतोय.
सत्तेवर असताना…
पक्ष मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून राज्याचा दौरा सुरू करणार आहेत. यापूर्वी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत पक्षश्रेष्ठींच्या संमतीनंतर उद्धव यांच्या दौऱ्यावर सहमती झाली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी समान नागरी कायदा (यूसीसी)बाबत पक्षाची भूमिकाही स्पष्ट केली. आमचा यूसीसीला पाठिंबा असून या प्रकरणावर पक्षाच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही, असे ते म्हणाले होते. तथापि, जोपर्यंत UCC मसुदा तयार होत नाही तोपर्यंत आम्ही त्यावर विश्वास ठेवू शकत नाही, असे ते म्हणाले.
तसेच, शनिवारी महाराष्ट्राचे सभापती राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांना अपात्रतेच्या मुद्द्यावर उत्तर देण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. शिंदे गटाच्या 40 आणि उद्धव गटाच्या 14 आमदारांना नोटीस बजावण्यात आल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. आमदारांना त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.