NCP vs BJP: राष्ट्रवादीच्या कार्यालयातील सरस्वती पूजन हे उशीरा सुचलेले शहाणपण!; भाजपाची टोलेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 06:55 PM2022-10-04T18:55:18+5:302022-10-04T18:56:11+5:30
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुनावलं...
NCP vs BJP: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न उपस्थित केला असल्याने त्या पक्षाच्या प्रदेश कार्यालयातील सरस्वती पूजन हे मनापासून झाले की, संपूर्ण राज्यातील हिंदू समाजाने टीका केल्यामुळे उशीरा सुचलेले शहाणपण आहे, असा सडेतोड सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. नागपूरला ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या सरस्वती पूजनाविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
"मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी हिंदू देवदेवतांचा अपमान करण्याचे अनेक प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बाबतीत घडले आहेत. त्यामध्ये छगन भुजबळ सामील झाले आहेत. त्यांनी अनेकदा ओवैसीसारखी भूमिका स्वीकारली आहे. ज्या सरस्वती मातेचे पूजन करून आपण सर्वांनी शिक्षणाचे धडे घेतले तिच्या अस्तित्वाबद्दल छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केले. राज्यभरातील हिंदू समाजाने छगन भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर त्या पक्षाला सरस्वती पूजनाचे शहाणपण सुचले आहे. जनतेचा दबाव वाढला म्हणून ही पूजा केली की, मनात सरस्वतीला स्थान आहे, म्हणून राष्ट्रवादीने पूजा केली हे पाहावे लागेल", असा टोला त्यांनी लगावला.
सरस्वती देवीच्या फोटोबाबत छगन भुजबळांनी काय दिलं स्पष्टीकरण?
"हे वक्तव्य मी ज्या दिवशी बोललो, त्या दिवशी सत्यशोधक समाजाचा आदर करण्याचा कार्यक्रम होता. मला माझे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. देशाविरोधात बोललो असतो तर ती वेगळी गोष्ट आहे. मी हेच बोललो होतो की, शाहू, फुले, आंबेडकरांनी आपल्याला शिकवले, त्यांचा आदर करायला हवा. त्यांची पूजा करायला हवी, असे माझे म्हणणे होते. आपल्याला सरस्वतीने काही शिकवले नाही, त्यामुळेच सरस्वती पूजनाचा प्रश्न येतोच कुठे. फुले, शाहू, आंबेडकर, आण्णासाहेब कर्वे यांनी महिलांच्या शिक्षणासाठी मोठे काम केले. मीदेखील हिंदूच आहे, हिंदुंसाठी बरीच कामे केली आहेत. देवीच्या दर्शनाला देखील जातो. पण, देवीऐवजी महापुरुषांचा सन्मान होणे गरजेचे आहे," असे स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिले.