Chandrashekhar Bawankule : "महाराष्ट्रातील तरुणांपेक्षा स्वतःच्या मुलाच्या भविष्याची जास्त चिंता"; भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 10:21 AM2023-10-25T10:21:34+5:302023-10-25T10:36:25+5:30
BJP Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
घराणेशाहीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मी घराणेशाहीचा पाईक आहे. मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. कुटुंबव्यवस्था न मानणाऱ्यांनी घराणेशाहीविषयी आम्हाला सांगू नये, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्याला संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात शिंदे गटावर, नरेंद्र मोदींवर आणि भाजपावर घणाघाती टीका केली आहे. या टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"महाराष्ट्रातील तरुणांपेक्षा स्वतःच्या मुलाच्या भविष्याची जास्त चिंता" असं म्हणत भाजपाने उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. तसेच "उद्धव ठाकरेंनी काँग्रेस धार्जिणी भूमिका घेत पुन्हा एकदा हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर काँग्रेस धार्जिणी भूमिका घेत पुन्हा एकदा हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. खरं तर हिंदुत्वाचा वारसा मिळूनही उद्धव ठाकरे यांना इंडी आघाडीचे गोडवे गावे लागत आहेत.@narendramodi’जींचं कर्तृत्व संपूर्ण देशानं मान्य केलं…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) October 25, 2023
"उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर काँग्रेस धार्जिणी भूमिका घेत पुन्हा एकदा हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. खरं तर हिंदुत्वाचा वारसा मिळूनही उद्धव ठाकरे यांना इंडिया आघाडीचे गोडवे गावे लागत आहेत. नरेंद्र मोदीजींचं कर्तृत्व संपूर्ण देशानं मान्य केलं आहे. पण उद्धव ठाकरे त्यांच्यावर टीका करत आहेत. खरं तर ती त्यांची पात्रता नाही. संपूर्ण देश मोदीजींचं कुटुंब आहे पण ‘माझं कुटुंब- माझी जबाबदारी‘ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना ते कळणार नाही."
"उद्धव ठाकरे शिवतीर्थावर बोलताना हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनबद्दल बोलतील असं वाटलं होतं पण ते मूग गिळून गप्प बसले. कंत्राटी पद्धतीने भरती सुरू केल्याबद्दल ते आज तरूणांची माफी मागतील, असं वाटलं पण त्यांना महाराष्ट्रातील तरूणांपेक्षा स्वतःच्या मुलाच्या भविष्याची जास्त चिंता वाटत आहे" असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.