हीच ती वेळ! 'शिवसेना-काल, आज आणि उद्या' पुस्तकातील संदर्भाचा दाखला देत भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 10:55 AM2023-04-05T10:55:21+5:302023-04-05T10:55:54+5:30
मनोहर जोशी यांनी शिवसेनेचा भूतकाळ विस्ताराने लिहिला, पण भविष्यकाळावर भाष्य करणे मात्र टाळले असं भाजपाने सांगितले.
मुंबई - ठाण्यातील रोशनी शिंदे मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गट आणि भाजपात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फडतूस गृहमंत्री आहेत असा हल्ला केल्यानंतर आता भाजपा नेतेही चांगलेच आक्रमक झाले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर उद्धव ठाकरे यांना पुन्हा अशी भाषा वापरली तर घराबाहेर पडू देणार नाही असा इशारा दिला. त्यानंतर आता भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना-काल, आज आणि उद्या या पुस्तकातील संदर्भ देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
केशव उपाध्ये यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, “स्वार्थप्रिय व आत्मकेंद्रित लोकांना ध्येयवाद उच्चारण्याचा अधिकार नसतो. ध्येयाचा धागा हातून सुटलेल्यां पतंगाचे भाकित कोण सांगू शकेल?”- प्राचार्य राम शेवाळकर (पान ९३७), “बाळासाहेबांच्या पश्चात त्यांची स्मृती जोपर्यंत जनमानसात प्रभावी असेल तोपर्यंतच उद्धवची प्रतिमा लोकप्रिय राहील व नंतर ती उतरणीस लागेल!”- ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ता ताम्हाणे (पान ९४३), बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या चार दशकांच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या ‘शिवसेनाः काल, आज, उद्या’ या शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या शोधनिबंधात वर्तविली गेलेली ही भाकिते आहेत.
तसेच मनोहर जोशी यांनी शिवसेनेचा भूतकाळ विस्ताराने लिहिला, पण भविष्यकाळावर भाष्य करणे मात्र टाळले. ते काम त्यांनी समाजातील काही मान्यवरांवर सोपविले. प्राचार्य राम शेवाळकर आणि स्वातंत्र्यसैनिक दत्ता ताम्हाणे यांनी वर्तविलेले भविष्य आज खरे ठरताना दिसत आहे. किंबहुना, आजची उद्धव ठाकरेंची स्थिती पाहता, तेव्हा वर्तविलेले भविष्य वास्तवात येण्याची ‘हीच ती वेळ’ असेच म्हणावे लागेल असा टोलाही केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
‘#हीच_ती_वेळ!’
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 5, 2023
“स्वार्थप्रिय व आत्मकेंद्रित लोकांना ध्येयवाद उच्चारण्याचा अधिकार नसतो. ध्येयाचा धागा हातून सुटलेल्यां पतंगाचे भाकित कोण सांगू शकेल?”- प्राचार्य राम शेवाळकर (पान ९३७)
“बाळासाहेबांच्या पश्चात त्यांची स्मृती जोपर्यंत जनमानसात प्रभावी असेल तोपर्यंतच उद्धवची प्रतिमा…
'फडतूस गृहमंत्री' या शब्दावरून रणकंदन
ठाण्यात शिवसेनेच्या काही महिला कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे नावाच्या युवती पदाधिकारीला मारहाण करण्यात आली. सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टवरून हे प्रकरण पुढे आले. या महिलेवर सध्या ठाण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमी महिलेला भेटण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे गेल्या होत्या. महिलेच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्याच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. राज्यात फडतूस गृहमंत्री असून लाळघोटेपणा करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर केला. त्याचसोबत फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरेंच्या भाषेवरून भाजपा नेतेही आक्रमक झाले. फडणवीस फडतूस नाही तर काडतूस आहे असा पलटवार भाजपाने केला.