Maharashtra Political Crisis: “किती फरक आहे पाहा... एसटी कामगारांसाठी अच्छे दिन आले, शिवसेना-भाजप सरकार...”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 01:59 PM2022-08-04T13:59:49+5:302022-08-04T14:01:08+5:30
Maharashtra Political Crisis: एसटी महामंडळाला नवसंजीवनी देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नवे सरकार स्थापन करताच अगदी पहिल्या कॅबिनेटपासून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याचा धडाका लावल्याचे पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यातील लाल परी अशी ओळख असलेल्या एसटीला भलामोठा ब्रेक लागला होता. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि एसटी महामंडळाला नवसंजीवनी मिळण्यासाठी राज्य सरकारने खूप मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने एसटी महामंडळासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
एसटी महामंडळाचे कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या होत्या. एसटी कर्मचाऱ्यांचे जवळपास महिनाभर आंदोलन चालले होते. या दरम्यानच्या काळात जिल्हे आणि गावं यांचा संपर्कच जणू काही तुटला होता, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या गंभीर परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या होत्या. त्यामध्ये पगारवाढीच्या मागण्या काही प्रमाणात मान्य करण्यात आल्या होत्या. पण या संपामुळे एसटी महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यासंदर्भात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
एसटी कामगारांसाठी अच्छे दिन आले
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या जून महिन्यातील वेतनासाठी शासनाने १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. हाच धागा पकडत चित्रा वाघ यांनी एक ट्विट केले असून, यामध्ये नव्या सरकारचे अभिनंदन करताना, माजी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. मविआच्या काळात झालेली १०० कोटींची चर्चा आणि शिंदे फडणवीसांच्या सरकारमध्ये होत असलेली १०० कोटींची चर्चा, किती फरक आहे पाहा.. एसटी कामगारांसाठी अच्छे दिन आले आहेत. शिवसेना भाजपा सरकारचे धन्यवाद, असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचे जूनचे वेतन अदा करण्यासाठी एसटी महामंडळाला ३६० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. राज्य शासनाने चालु आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात १ हजार ४५० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. त्यातील ३०० कोटी रुपये एप्रिलसाठी, तर, ३६० कोटी रुपये मे महिन्याच्या वेतनासाठी देण्यात आले आहेत.