“उद्धवजी, तुम्ही राजीनामा दिला तेव्हाच मविआचा पोपट मेला, कायद्याची भाषा समजत नसेल तर...”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 04:26 PM2023-05-12T16:26:52+5:302023-05-12T16:27:34+5:30
Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ट्युशन लावा, असा खोचक सल्ला भाजपकडून देण्यात आला आहे.
Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता महाविकास आघाडी तसेच भाजप आणि शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत. याशिवाय न्यायालयाने दिलेल्या निकालावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता ठाकरे गटाने केलेल्या टीकेवर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
आता खर्या अर्थाने लढा सुरू झाल्याचे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचा निकालही आला आहे. आपला लढा जनतेसाठी आहे. हा लढा देश आणि राज्यासाठी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. सर्वोच्च न्यायलायाने लक्तरे टांगल्यानंतर नैतिकतेला धरून शिंदेंनी राजीनामा द्यायला हवा. तुम्हाला जीवदान मिळाले असेल तर ते तात्पुरते आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यासमोर जो पोपट ठेवला, तो मेलेला आहे, हालचाल नाही, परंतु तो मृत घोषित असल्याचे काम विधानसभा अध्यक्षांना दिले आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.
उद्धवजी, तुम्ही राजीनामा दिला तेव्हाच मविआचा पोपट मेला
उद्धव जी ज्या दिवशी तुम्ही राजीनामा दिला त्याच दिवशी महाविकास आघाडीचा पोपट मेला. सुप्रीम कोर्टानं पण तेच सांगितलं. तुम्हाला कायद्याची भाषा समजत नसेल तर आमच्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ट्युशन लावा, असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे. तसेच ज्यांची पक्ष प्रमुख पदाची नियुक्ती केंद्रीय निवडणूक आयोगानं बेकायदा ठरवली तेच ज्ञान पाजळताहेत की राज्यपाल नियुक्तीवर नियमावली आणावी. उद्धवा, अजब तुझा कारभार !, अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली.
दरम्यान, नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला नको होता. महाविकास आघाडीने लगेच नवीन अध्यक्ष बनवायला पाहिजे होते. असे झाले असते तर १६ आमदार अपात्र ठरले असते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले होते. यावर बोलताना, सरकार पडण्यासाठी भाजप जबाबदार असल्याचा कांगावा करणाऱ्यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर बोलावे. नाना पटोले, उद्धव ठाकरे आता तुमचे कान सोनाराने (अजित पवार) टोचले, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.