Chitra Wagh : "मविआ काळात घडलेलं भंडारा अग्निकांड विसरलात का हो ताई?"; चित्रा वाघ यांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 04:41 PM2023-10-06T16:41:30+5:302023-10-06T16:51:37+5:30
BJP Chitra Wagh Slams NCP Supriya Sule : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयांत रुग्णांच्या झालेल्या मृत्यूने सर्वत्र खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. "गरीब जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. या जबाबदारीचा सरकारने त्याग केला आहे का? गोरगरिबांच्या जीवाचं सरकारला काहीच मोल वाटत नाही का? असा संतप्त सवाल विचारला आहे.
भाजपाने आता सुप्रिया सुळेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "मविआ काळात घडलेलं भंडारा अग्निकांड विसरलात का हो तुम्ही ताई?, ११ नवजात बालकं पुर्णपणे जळून खाक झाली त्यावेळी त्यांच्या मातांचा आक्रोश नाही का ऐकू आला आपल्याला?" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र सोडलं आहे. "कसं सोयींचं छान राजकारण करता येत हो मोठ्ठ्या ताई तुम्हाला" असं म्हणत निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"कसं सोयींचं छान राजकारण करता येत हो मोठ्ठ्या ताई"
"राज्याच्या “मोठ्ठ्या ताई” २ दिवसापासून राज्यसरकारवर टीवटीव करतांना दिसताहेत.. कसं सोयींचं छान राजकारण करता येत हो मोठ्ठ्या ताई तुम्हाला … @supriya_sule झालेली घटना दुदैवी आणि वाईटचं यात हलगर्जीपणा करणाऱ्यांना सोडलं जाणार नाहीच याबाबत आपण निश्चींत रहा…राज्यातील प्रत्येकाचा जीव आमच्या साठी महत्वाचा आणि राज्यसरकार मजबुतीने ठाम पणे पिडीत परीवारांच्या सोबत उभं आहे शिवाय पुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी ही उपाययोजना केली जाईल."
"आरोग्यमंत्र्याचा राजीनामा तुम्ही का नाही घेतलात ताई?"
"मविआ काळात घडलेलं भंडारा अग्नीकांड विसरलात का हो तुम्ही ताई??? ११ नवजात बालकं पुर्णपणे जळून खाक झाली त्यावेळी त्यांच्या मातांचा आक्रोश नाही का ऐकू आला आपल्याला??? त्या तुमच्या मविआ काळात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी अग्नीकांड झाले ज्यात कित्येक माणसं दगावलीत. तरी ही त्यावेळच्या तुमच्या पक्षाच्या आरोग्यमंत्र्याचा राजीनामा तुम्ही का नाही घेतलात ताई??? तिथं ना स्मोक डिटेक्टर बसवले होते, ना अग्निरोधक यंत्रणा. तेव्हा तोंडदेखली मलमपट्टी म्हणून तुम्ही राज्यातल्या सगळ्याचं हॉस्पिटल चे ऑडीट करण्याचे आदेश दिले पण, तुमच्या इतर आश्वासनांसारखं ऑडिटही हवेतच विरून गेलं."
"तुमच्या मविआ आघाडी सारखं फेसबुकवरचं सरकार नाही"
"टीका करणं हा तुमचा अधिकार आहे पण आताचं महाराष्ट्रातील महायुतीच सरकार action mode मधलं सरकार आहे ताई. ते तुमच्या मविआ आघाडी सारखं फेसबुकवरचं सरकार नाही. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरच्या दुर्घटनेला जबाबदार दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय ताई...आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन उपाययोजनाही केल्या जाताहेत पण, तरीही तुमचे राज्य सरकारवर बेछूट आरोप सुरूच आहेत...कारण, कोमात गेलेल्या तुमच्या राजकारणाला जिवंत ठेवण्यासाठी या घटनेतूनच सलाईन मिळतंय…खरयं ना."
"कोरोना काळात ऑक्सिजन आणि औषधांअभावी रूग्ण तडफडत असताना तुम्ही मात्र नाकर्त्यासारखे सत्तेच्या गादीला जळवांसारखे चिकटून होतात. आणि, तत्कालीन मुख्यमंत्री पालीसारखे मातोश्रीच्या भिंतींना चिकटून होते. ते घराबाहेर पडलेच नाहीत कधी. राज्याची आरोग्ययंत्रणा कार्यक्षम बनवण्याचा तुमचा राजकारणी वादा हवेतचं विरला. राजकारण आपल्या जागी आहे, पण तुमचा कळवळा तरी खरा असू द्या. ‘ऐसी कळवळ्याची जाती, लाभाविण करी प्रीती..’ हे तुकोबांचं वचन लक्षात ठेवा आणि मग राजकारण करा….मोठ्ठ्या ताई" असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.