विरोधकच नसल्याचा भाजपचा दावा, तरी मोदी-शाह यांच्या सभांसाठी जोर !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 02:27 PM2019-10-12T14:27:13+5:302019-10-12T14:27:28+5:30
विरोधी पक्ष अस्तित्वात नसून शाळकरी मुलांना विचारले तर, तेही सांगतील कोण निवडून येणार एवढा आत्मविश्वास भाजप नेत्यांना आहे. मात्र असं असेल तर मग पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची प्रचारासाठी काय गरज, असा सवाल बार्शी येथील सभेत शरद पवारांनी उपस्थित केला आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीतील शानदार विजयानंतर भारतीय जनता पक्ष राज्यातील विधानसभा निवडणुकाला सामोरे जाताना फॉर्मात आहे. अर्थात ओपिनियन पोलमधून देखील भाजपसाठी पोषक वातावरण असल्याचे सांगण्यात आले आहे. हाच धागा पकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार विरोधीपक्ष नसल्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीयमंत्री अमित शाह यांच्या सभांचा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष नसल्याच्या भाजपच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वाऱ्याची दिशा पाहून विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेत प्रवेश मिळविण्यावर भर दिला. यापैकी अनेकांना प्रवेश मिळाला तर काही आहे तिथेच कायम राहिले. विरोधीपक्षाचे नेते आपल्या पक्षात घेतल्याने सत्ताधारी भाजपची ताकत वाढली. याच वाढलेल्या ताकतीच्या जोरावर भाजपने युतीत अधिकाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. अर्थात जागा वाढवून घेण्यामागचा मुख्य हेतू भाजपचा स्पष्ट बहुमत हाच आहे.
मागील पाच वर्षांत अनेक नेते सोडून गेल्यामुळे विरोधीपक्ष कमकुवत बनला आहे. मात्र निवडणुकीची तयारी विरोधी पक्षाने देखील जोरात सुरू केली आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार खुद्द मैदानात उतरले आहे. तर काँग्रेसने पहिल्या यादीत अनेक आश्वासक उमेदवार दिले आहेत. पण सत्ताधाऱ्यांकडून समोर प्रतिस्पर्धीच नसल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी विरोधी पक्षाची धास्ती देखील घेतल्याचे दिसून येते. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या प्रचारसभांचा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
दरम्यान विरोधी पक्ष अस्तित्वात नसून शाळकरी मुलांना विचारले तर, तेही सांगतील कोण निवडून येणार एवढा आत्मविश्वास भाजप नेत्यांना आहे. मात्र असं असेल तर मग पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची प्रचारासाठी काय गरज, असा सवाल बार्शी येथील सभेत शरद पवारांनी उपस्थित केला आहे.