भाजपा क्लीन बोल्ड, तर शिवसेना रनआउट
By admin | Published: August 30, 2016 02:47 AM2016-08-30T02:47:26+5:302016-08-30T02:47:26+5:30
ठाणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावरच झालेल्या दोन प्रभागांतील पोटनिवडणुकीकडे सराव सामना म्हणा किंवा रंगीत तालीम म्हणून पाहिले जात होते
अजित मांडके , ठाणे
ठाणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावरच झालेल्या दोन प्रभागांतील पोटनिवडणुकीकडे सराव सामना म्हणा किंवा रंगीत तालीम म्हणून पाहिले जात होते. या सराव सामन्यात भाजपा क्लीन बोल्ड झाली असून शिवसेनादेखील रनआउट झाली आहे.
प्रभाग क्र. ३२ हा शिवसेना नेते तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात अपक्ष उमेदवाराने सुरुंग लावून यश संपादन केले आहे. तर, दुसरीकडे ५३ मध्ये शिवसेनेला यश आले असले तरीदेखील एका प्रभागात पराभव पत्करावा लागल्याने शिवसेना या सराव सामन्यात रनआउट झाल्याचे म्हणावे लागणार आहे. तर, दुसरीकडे या सराव सामन्यात अपेक्षित यश संपादन करण्याची इच्छा बाळगून मैदानात उतरलेली भाजपा मात्र क्लीन बोल्ड झाल्याने आगामी सार्वत्रिक निवडणुकीत शतप्रतिशत भाजपाच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले आहे.
या पोटनिवडणुकीत अनपेक्षित असा निकाल लागला आहे. प्रभाग क्र. ३२ अ मध्ये शिवसेना, भाजपा आणि काँग्रेसला चारीमुंड्या चित करून अपक्ष उमेदवार स्वाती देशमुख यांनी १९४ मतांनी विजय मिळवला. तर, प्रभाग क्र. ५३ अ मध्ये शिवसेनेच्या पूजा करसुळे यांचा १८५ मतांनी विजय झाला. ३२ अ मध्ये शिवसेनेच्या उमेदवार संगीता वाघ यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक आमदार तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर दिग्गज मंडळींच्या येथे सभा झाल्या होत्या. असे असतानाही येथे शिवसेनेचा पराभव झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केवळ भाजपा उमेदवाराने येथे मते खाल्ल्यानेच शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचे आता खाजगीत बोलले जात आहे. परंतु, भाजपादेखील या ठिकाणी अपेक्षित मते मिळवण्यास अपयशी ठरली आहे. या प्रभागावर आधीच काँग्रेसचे वर्चस्व होते. पक्षाचे नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी राजीनामा दिल्याने हा प्रभाग आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेनेने आखलेली रणनीती अपयशी ठरली.
प्रभाग क्र. ५३ मध्ये शिवसेनेला यश आले आहे. मागील निवडणुकीत भाजपाच्या वाट्याला हा प्रभाग होता. त्यानुसार, भाजपाच्या उमेदवाराचा येथे निसटता पराभव झाला होता. त्यामुळे पुन्हा हा प्रभाग भाजपाने मागितला होता. परंतु, शिवसेनेने तो सोडला नाही. त्यामुळेच येथे भाजपाने उमेदवार उभा केल्याने तेथे खऱ्या अर्थाने युती तुटली. प्रत्यक्षात या दोन प्रभागांच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पक्षांना आपली ताकद आजमावयाची संधी होती. त्यात काही अंशी शिवसेना यशस्वी झाली असली तरी प्रभाग क्र. ३२ मध्ये भाजपाच्या उमेदवारामुळे शिवसेनेला धक्का बसला.