भाजपाला काँग्रेसचीच साथ
By admin | Published: March 24, 2017 01:46 AM2017-03-24T01:46:33+5:302017-03-24T01:46:33+5:30
‘काँग्रेसमुक्त भारत’ अशी घोषणा देऊन सोनिया गांधी व राहुल गांधींवर थेट टीका करणाऱ्या भाजपाला खुद्द काँग्रेसनेच केवळ
यवतमाळ : ‘काँग्रेसमुक्त भारत’ अशी घोषणा देऊन सोनिया गांधी व राहुल गांधींवर थेट टीका करणाऱ्या भाजपाला खुद्द काँग्रेसनेच केवळ सत्तेच्या लालसेपोटी साथ दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत यवतमाळ, जळगावसह राज्यात अनेक ठिकाणी हे विसंगत चित्र पहायला मिळाले आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपाने ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा केली. त्यासाठी काँग्रेस पक्षच नव्हे तर या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भाजपाने टार्गेट केले. संपूर्ण निवडणूक प्रचारात ‘काँग्रेसमुक्त भारत’ हाच मुख्य अजेंडा ठेवण्यात आला होता. काँग्रेसला देशातून हाकलून लावू पाहणाऱ्या भाजपाला धडा शिकवणे, त्यांच्यापासून अंतर राखून रहाणे, शक्य असेल तेथे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे, त्यांच्या जातीयवादी विचारधारेला जनतेपुढे उघडे करणे आदी प्रयत्न काँग्रेसकडून होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात काँग्रेस नेत्यांनी भाजपाला विरोध करण्याऐवजी केवळ सत्तेसाठी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे पसंत केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या आदेशाला मुठमाती
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका राज्यात पार पडल्या. या निवडणुकीत विरोधी बाकावर बसावे लागले तरी चालेल, मात्र जातीयवादी पक्षांशी युती करू नका, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी घेतली होती. परंतु त्यांच्या या भूमिकेला काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी छेद देऊन जातीयवादीय पक्षांना सत्तेत मदतीचा हात दिला. कुठे प्रत्यक्ष पाठिंबा देऊन तर कुठे सभागृहात अनुपस्थित राहून काँग्रेसने भाजपाला पाठबळ दिल्याचे चित्र आहे.
यवतमाळात ठाकरे-मोघेंचा खेळ
यवतमाळात भाजपाच्या पाठिंब्यावर काँग्रेसने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविले. सुरुवातीला विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचा त्यासाठी आग्रह होता. अन्य काही नेते विरोधात होते. मात्र अध्यक्षपदाचा लालदिवा आपल्या आर्णी विधानसभा मतदारसंघात येऊ शकतो याची जाणीव होताच माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे हेसुद्धा भाजपाचा पाठिंबा घेण्यासाठी तयार झाले. ठाकरे-मोघेंच्या मागे जिल्ह्यातील काँग्रेसचे अन्य नेतेही वाहवत गेले. जळगावातही भाजपा-काँग्रेसची सत्ता बसली. अन्य काही ठिकाणीसुद्धा अशी छुपी अॅडजेस्टमेंट करण्यात आल्याची माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
काँग्रेसला संपविणे हेच टार्गेट-
काँग्रेसला संपविण्यासाठी विविध पर्याय भाजपाकडून अवलंबिले जात आहे. काँग्रेसमधील नाराज, दुखावलेल्या व असंतुष्ट कार्यकर्त्यांना उमेदवारी, लाभ, पदाचे आमिष देऊन मोठ्या प्रमाणात भाजपात आणले जात आहे. आता सत्तेत वाटेकरी करून काँग्रेसच्या नैतिकतेलाच भाजपाकडून सुरूंग लावला गेला आहे. सत्तेसाठी भाजपाची साथ घेतल्याने आता काँग्रेस नेते-पदाधिकाऱ्यांना भाजपाला जातीयवादी पक्ष म्हणण्याची नैतिकताच उरलेली नाही. काँग्रेसचे तोंड बंद करण्याची भाजपाची ही खेळी यशस्वी झाल्याचे दिसते.
अध्यक्ष काँग्रेसचा, रिमोट भाजपाकडे-
यवतमाळात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष काँग्रेसचा असला तरी सत्तेची सर्व सूत्रे व रिमोट भाजपाच्या हाती आहे. या माध्यमातूनही काँग्रेसला संपविण्याचा प्रयत्न होतो आहे. काँग्रेस-भाजपा-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असली तरी जाहिरात फलकांवर केवळ भाजपा नेत्यांची छायाचित्रे झळकत असून काँग्रेस बरीच मागे पडली आहे.
‘काँग्रेस का हाथ, मोदी के साथ’ -
भाजपा-काँग्रेसच्या या सत्ता-समीकरणावर सोशल मीडियावरून काँग्रेस नेत्यांवर जोरदार टीका केली जात आहे. ‘काँग्रेस का हाथ, मोदी के साथ’ असा प्रचार करुन ‘काँग्रेसमुक्त भारत’ या भाजपाच्या घोषणेला त्यांच्या पाठीराख्यांकडून आणखी सशक्त केले जात आहे. सत्तेसाठी काँग्रेस काय करू शकते, हे जनतेला दाखविण्याचा प्रयत्न या निमित्ताने भाजपा समर्थकांकडून होत आहे.