भाजपा, काँग्रेस समान; शिवसेनेला आला मान
By admin | Published: February 24, 2017 04:38 AM2017-02-24T04:38:18+5:302017-02-24T04:38:18+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत भाजपाने जोरदार मुसंडी मारत १४ जागांवर
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत भाजपाने जोरदार मुसंडी मारत १४ जागांवर घवघवीत यश मिळविले. काँग्रेसला आपले मागील बळ राखतानाही चांगलाच घाम फुटला. या पक्षाला १४ जागा मिळाल्या. परंतु सत्तेच्या चाव्या मात्र मतदारांनी शिवसेनेच्या हातात दिल्या असून त्या पक्षाला १० जागा मिळाल्या. जिल्हा परिषदेच्या ६७ सदस्यांच्या सभागृहात राष्ट्रवादीला ११ जागा मिळाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मात्र वाताहात झाली असून त्यांना कशाबशा दोनच जागा मिळाल्या.
मतदारांनी आमदार चंद्रदीप नरके यांचे दोन बंधू, माजी खासदार निवेदिता माने यांच्या सून, दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक व उदयसिंहराव गायकवाड यांचे नातू, माजी आमदार भरमू पाटील व नरसिंगराव पाटील, यशवंत एकनाथ पाटील यांच्या वारसांना पराभवाची धूळ चारली.
भाजपाचे नेते पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दोन्ही काँग्रेसमधील मातब्बरांना पक्षात घेऊन भक्कम मोट बांधली. त्यामुळे त्यांना यशापर्यंत जाता आले. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच भाजपाचे कमळ या सत्तेत फुलण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे आजचे तरी चित्र आहे.
कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसने भाजपाच्या हातातोंडाशी आलेला विजय हिसकावला होता नेमके त्याच्या उलटी स्थिती येथे झाली आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या सून शौमिका महाडिक या भाजपाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार असू शकतात. तशा हालचाली सुरु झाल्या आहेत.
कोल्हापूर
पक्षजागा
भाजपा१४
शिवसेना१०
काँग्रेस१४
राष्ट्रवादी११
इतर१८