भाजपा-काँग्रेसची ‘माघार’ युती
By admin | Published: December 13, 2015 03:08 AM2015-12-13T03:08:39+5:302015-12-13T03:08:39+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची असलेली नागपूरच्या विधान परिषदेची जागा काँग्रेसने आज आंदण देऊन टाकली.
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची असलेली नागपूरच्या विधान परिषदेची जागा काँग्रेसने आज आंदण देऊन टाकली. काँग्रेसचे उमेदवार अशोकसिंह चव्हाण यांनी माघार घेतल्याने भाजपाचे गिरीश व्यास बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला. काँग्रेसने अशी अचानक माघार घेतल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दुसरीकडे मुंबईत भाजपाचे मनोज कोटक यांनी माघार घेतल्याचा फायदा काँग्रेसचे भाई जगताप यांना मिळेल. त्यामुळे भाजपा-काँग्रेसने एकमेकांना मदत करण्याची अनोखी ‘माघार’युती आज समोर आली. मुंबईत विधान परिषदेच्या
दोन जागा आहेत. त्यातील एका जागेवर शिवसेनेचे रामदास कदम यांचा विजय निश्चित मानला जातो. दुसरी जागा युतीमध्ये भाजपा लढणार होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात चर्चा होऊन तसा निर्णयदेखील झाला होता. भाजपाचे कोटक यांच्या उमेदवारीमुळे भाई जगताप यांना निवडून येण्यासाठी निश्चितपणे संघर्ष करावा लागला असता. भाजपासाठी नागपूरची जागा प्रतिष्ठेची होती तर मुंबईची जागा कायम राखणे काँग्रेससाठी आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर, राजधानीतून भाजपाने तर उपराजधानीतून काँग्रेसने माघार घेण्याचे ठरले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुंबईत मनसेने निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने मनसेची मते मिळवून जागा जिंकण्याच्या भाजपाच्या इराद्यावर तसेही पाणी फिरले होते. त्यामुळे हसे करून घेण्यापेक्षा नागपूरची जागा पदरात पाडून घेणे भाजपाने पसंत केले. नागपूरची निवडणूक बिनविरोध होणार असली तरी मुंबईत राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन अपक्ष लढत असलेले प्रसाद लाड यांची उमेदवारी कायम असल्याने निवडणूक बिनविरोध होणार नाही.
नागपुरात भाजपाचे गिरीश व्यास व महापौर प्रवीण दटके यांनी अर्ज दाखल केला होता. व्यास हे अधिकृत उमेदवार असल्यामुळे दटके यांनी शुक्रवारीच अर्ज मागे घेतला होता. काँग्रेसकडून अधिकृत उमेदवार अशोकसिंग चव्हाण व नगरसेवक संजय महाकाळकर (डमी) यांनी अर्ज दाखल केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी २.४५ च्या सुमारास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडून नागपुरातील काँग्रेसची उमेदवारी मागे घ्या, असा आदेश आला. या आदेशाची अंमलबजावणी करीत चव्हाण व महाकाळकर यांचे अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे भाजपाचे गिरीश व्यास बिनविरोध विजयी झाले. (प्रतिनिधी)
पक्षादेशाचे पालन केले ...
काँग्रेसकडे विजयासाठी आवश्यक संख्याबळ नव्हते. पराभव निश्चित होता. त्यानंतरही निवडणूक लढविली असती तर मोठा घोडेबाजर झाला असता. शेवटी काँग्रेसचा उमेदवारी अर्ज मागे घ्या, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली. प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेचे पालन करीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. मुंबईत काय झाले याची आपल्याला माहिती नाही.
- विकास ठाकरे,
शहर अध्यक्ष, काँग्रेस