प्रवक्त्यांमुळे भाजपा सातत्याने अडचणीत; राम कदम, मधू चव्हाण, अवधूत वाघ यांच्यामुळे पंचाईत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 01:52 AM2018-10-13T01:52:57+5:302018-10-13T01:53:14+5:30
सिद्धी माध्यमांमधून पक्षावर होणारी टीका, आरोप आदींना सामोरे जात त्यातून पक्षाची व पक्षातील नेत्यांची पाठराखण करण्याची जबाबदारी प्रवक्त्यांवर असते पण प्रवक्त्यांमुळे पक्षच अडचणीत आल्याचा अनुभव सध्या प्रदेश भाजपाला येत आहे.
मुंबई : प्रसिद्धी माध्यमांमधून पक्षावर होणारी टीका, आरोप आदींना सामोरे जात त्यातून पक्षाची व पक्षातील नेत्यांची पाठराखण करण्याची जबाबदारी प्रवक्त्यांवर असते पण प्रवक्त्यांमुळे पक्षच अडचणीत आल्याचा अनुभव सध्या प्रदेश भाजपाला येत आहे.
भाजपाचे एक प्रवक्ते आमदार राम कदम यांनी मुलींविषयी वादग्रस्त विधान करून मध्यंतरी टीका ओढावून घेतली होती. त्यांच्यावर पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यांना साधी कारणे दाखवा नोटीसदेखील बजावली नाही. तर दुसरे प्रवक्ते मधु चव्हाण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करीत एका महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रदेश भाजपा कार्यकारिणीच्या ऐन तोंडावर झालेल्या या प्रकाराने खळबळ माजली होती. चव्हाण यांच्यावरदेखील पक्षाने कोणतीही कारवाई केली नाही. राम कदम आणि चव्हाण यांना कोणत्याही चॅनेलकडून आता प्रवक्ते म्हणून बोलविले जात नाही, अशी परिस्थिती आहे.
अन्य एक प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचे ११ वे अवतार असल्याचे टिष्ट्वट करून शुक्रवारी वाद ओढावून घेतला. इंदिरा गांधी व राजीव गांधी हे शहीद झाले नव्हते असे विधान त्यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते.
भंडारी, उपाध्ये लढवत आहेत किल्ला
माधव भंडारी आणि केशव उपाध्ये हे दोन महत्त्वाचे प्रवक्ते शिल्लक आहेत की, ज्यांची जीभ घसरलेली नाही. भंडारी अत्यंत विश्वासाने माध्यमांमध्ये बोलतात. उपाध्ये हे बरीच वर्षे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे पीए होते. एक पीए प्रवक्ते म्हणून काय दिवे लावणार, अशी अपप्रसिद्धी स्वत:ला ‘वाघ’ म्हणवून घेणाऱ्यांनी केली होती, पण इतरांपेक्षा उपाध्ये उजवे ठरत आहेत.