उल्हासनगरात भाजप नगरसेवकावर हल्ला; भररस्त्यात शिवसैनिकांनी दिला चोप, फासलं काळं!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 06:27 PM2021-08-24T18:27:53+5:302021-08-24T18:28:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून ...
लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण
भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून शिवसैनिकांमध्ये चांगलीच संतापाची लाट पसरली आहे. या विधानामुळे मंगळवारी कल्याण डोंबिवलीमध्येही ठिकठिकाणी सेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. कल्याणात सकाळी भाजपाच्या पदाधिका-याला मारहाण झाल्याची घटना ताजी असतानाच उल्हासनगरमध्ये देखील भाजपाच्या नगरसेवकाला शिवसैनिकांनी भररस्त्यात चोप दिल्याची घटना घडली आहे. इतकंच नाही तर नगरसेवकाच्या अंगावर शाई देखील फेकण्यात आली आहे.
प्रदीप रामचंदानी असे या भाजप नगरसेवकाचे नाव आहे.महापालिकेच्या मुख्यालयासमोर असलेल्या कार्यालयातून रामचंदानी हे महापालिका मुख्यालयात जात होते. यावेळी शिवसैनिकांनी भररस्त्यात रामचंदानी यांना घेरलं आणि खाली पाडलं. त्यानंतर शिवसैनिकांनी त्यांच्या तोंडाला काळं फासलं. रामचंदानी हे सेनेबद्दल वारंवार आक्षेपार्ह विधान करत असल्याने मारहाण केल्याचे सेनेकडून सांगण्यात आले. तर उल्हासनगर शिवसेना शहर प्रमुखांच्या अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी करत असल्याने आपल्यावर हा हल्ला झाल्याचे रामचंदानी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान उल्हासनगरमध्ये सेना आणि भाजप मधील रस्सीखेच सर्वश्रुत आहे. त्यातच येत्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा वाद विकोपाला गेल्याने कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेबद्दल नागरीकांना नियम पाळण्याचे आवाहन केंद्र आणि राज्य सरकारकडून केले जात आहे. मात्र एकीकडे भाजपाची जनाआशीर्वाद यात्रा आणि दुसरीकडे सेनेच्या आंदोलनामधली तोबा गर्दी यामुळे लोकप्रतिनिधीच तिसऱ्या लाटेला आमंत्रण देतायेत की काय? असा सवाल निर्माण झाला आहे.