पक्षांतराच्या धास्तीने भाजपाचे नगरसेवकांना अभय

By admin | Published: January 29, 2017 05:51 PM2017-01-29T17:51:21+5:302017-01-29T17:51:21+5:30

नगरसेवकांवर नागरिकांचा प्रचंड रोष असल्याचे समोर आल्यानंतर संबंधितांचे तिकीट कापण्याची तयारी भाजपाने चालविली होती.

BJP corporators from Abhay | पक्षांतराच्या धास्तीने भाजपाचे नगरसेवकांना अभय

पक्षांतराच्या धास्तीने भाजपाचे नगरसेवकांना अभय

Next

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 29 - भाजपाने शहरात केलेल्या पहिल्या सर्वेक्षणात नगरसेवकांवर नागरिकांचा प्रचंड रोष असल्याचे समोर आल्यानंतर संबंधितांचे तिकीट कापण्याची तयारी भाजपाने चालविली होती. मात्र एेनवेळी तिकीट कटल्याच्या नाराजीतून आपल्या नगरसेवकांनी इतर पक्षांचा हात धरून रिंगणात उतरू नये, याची धास्ती भाजपाने घेतली आहे. त्यामुळे सुमारे ९० टक्के नगरसेवकांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे.
मध्य नागपुरातील भाजपाचे नगरसेवक रमेश पुणेकर यांनी स्थानिक नेत्यांशी पटत नसल्यामुळे भाजपाला रामराम ठोकला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना, नागपुरात दिग्गज नेते असताना भाजप नगरसेवकाने काँग्रेसवासी होणे ही बाब भाजपाची चिंता वाढविणारी आहे. यामुळे नगरसेवकांचे तिकीट कापले तर ते दुसऱ्या पक्षांकडून रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही व तसे झाले तर पक्षाला त्याचा फटका बसेल याचा धसका भाजपाने घेतला आहे. त्यामुळेच सर्वेक्षणात मागे पडूनही बहुतांश नगरसेवकांचे तिकीट पक्के करण्यात आले आहे.
भाजपाने नगरसेवकांना गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. काही नगरसेवकांनी त्यानंतरही मुदतीत अहवाल सादर केले नाहीत, अशा नगरसेवकांना तिकीट कापले जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर नगरसेवकांनी धावपळ करीत भाजपा कार्यालयात अहवाल जमा केले. दुसरे व तिसरे सर्वेक्षण होणार असल्याचे कळताच बरेच नगरसेवकक प्रभागात सक्रिय झाले. पक्षाच्या जनसंवाद अभियानात सहभागी होऊन घरोघरी फिरले. नगरसेवक सक्रिय झाल्यामुळे आता त्यांना संधी दिली जाईल, असे भाजपाच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

उद्या पहिली यादी, बड्यांचा समावेश
- भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी ३१ जानेवारी रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत महापालिकेतील मोठ्या चेहऱ्यांचा समावेश राहण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकाही मोठ्या नेत्याचे तिकीट कटणार नाही. तिकीट कटले तर मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाईल व विरोधकांना बळ मिळेल, अशी कारणमीमांसा यामागे दिली जात आहे.

जास्त इच्छुकांमुळे घमासान
- भाजपकडे एका जागेसाठी १५ ते २० इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. मुलाखतींमध्ये सर्वांनी आपण सक्षम उमेदवार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे काही ठिकाणी विद्यमान नगरसेवकांची उमेदवारीही अडचणीत आली आहे. इच्छुकांची संख्या जास्त व तेवढेच आक्रमक असल्यामुळे भाजपामध्ये तिकीट मिळविण्यासाठी घमासान चालू आहे.

Web Title: BJP corporators from Abhay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.