भाजपा नगरसेवकाच्या खुनाची सुपारी, पक्षाच्या नेत्याचेच कारस्थान : ५० लाखांपैकी १० लाख दिल्याचे तपासात उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:44 AM2017-12-20T01:44:26+5:302017-12-20T01:44:34+5:30
डोंबिवलीतील भाजपा पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांना ठार मारण्यासाठी भाजपाचा ग्रामीणचा पदाधिकारी असलेल्या एका नगरसेवकाने ५० लाखांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांनी पकडलेल्या दरोडेखोरांच्या चौकशीतून ही माहिती उघड होताच एकच खळबळ उडाली.
ठाणे : डोंबिवलीतील भाजपा पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांना ठार मारण्यासाठी भाजपाचा ग्रामीणचा पदाधिकारी असलेल्या एका नगरसेवकाने ५० लाखांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांनी पकडलेल्या दरोडेखोरांच्या चौकशीतून ही माहिती उघड होताच एकच खळबळ उडाली.
ग्रामीण भागात पक्षावर वर्चस्व मिळवण्यासाठी आणि तेथील आमदारकीचा मार्ग सूकर होण्यासाठी हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच कुणाल यांचे काका वंडार पाटील यांच्या मुलाची काही वर्षांपूर्वी हत्या झाली होती. त्याचा बदला घेण्यावरून कुणाल आणि या हल्लेखोरांत वैमनस्य आहे. त्यातून कुणाल यांचा काटा काढण्याचा कट रचल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्या दृष्टीने तपास सुरू झाला आहे. नाव घेतलेल्या नगरसेवकांचे कॉल रेकॉर्ड तपासले जात आहे.
या दरोडेखोरांकडून तीन दरोड्यांचीही उकल झाली असून त्यांच्याकडून तीन लाख ४० हजारांच्या रोकडसह एक रिव्हॉल्व्हर, एक पिस्टल, दोन गावठी कट्टे, १६ जिवंत काडतुसे आणि दोन मोटारसायकली जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कुणाल पाटील हे कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागातील भाजपा पुरस्कृत नगरसेवक आहेत. त्यांना ठार मारण्यासाठी डोंबिवलीत भाजपाचा पदाधिकारी असलेल्या एका नगरसेवकाने सुपारी दिली होती. त्यातील १० लाख रुपये आगाऊ घेतल्याचे या दरोडेखोरांनी कबुलीजबाबात म्हटले आहे. ज्यावेळी कुणाल यांना ठार मारण्यासाठी हे टोळके दबा धरून बसले होते, तेव्हा ते बाहेर न पडल्यामुळे हल्ल्यातून बचावल्याची कबुली त्यांनी दिली.
भाजपाच्या पुरस्कृत नगरसेवकाला भाजपाच्याच ज्येष्ठ नगरसेवकाने ठार मारण्याची सुपारी दिल्याचे उघड झाल्याने पक्षाच्या कल्याण-डोंबिवली आणि ग्रामीण भागातील वर्तुळात एकच खळबळ उडाली. दरोडयाची चौकशी सुरु असताना ही माहिती उघडकीस आल्याने या संदर्भातील नव्याने गुन्हा दाखल होणार असून त्याची स्वतंत्रपणे चौकशी केली जाणार असल्याचे ठाणे ग्रामीणच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’ ला सांगितले.
... आणि कट उघड झाला : भिवंडीच्या कुडूस येथील एका दरोड्याचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांचे पथक करत होते. सीसीटीव्ही तसेच खबºयांच्या आधारे त्यांनी १६ डिसेंबरला भिवंडीतून कैलास घोडविंदे याला अटक केली.
त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे राजू शेट्टी, अलुद्दीन शेख, विजय मेनबन्सी या सहा जणांना अटक झाली. त्यांच्यातील विजय मेनबन्सी याने दिलेल्या माहितीतून कुणाल पाटील यांना ठार मारण्याची सुपारी दिल्याचा प्रकार उघड झाला.