प्रादेशिक पक्षांचा पराभव भाजप करू शकला नाही - उद्धव ठाकरे
By admin | Published: May 20, 2016 08:06 AM2016-05-20T08:06:56+5:302016-05-20T11:38:00+5:30
विधानसभेचा निकाल म्हणजे भाजपचा देशभरात विस्तार होत असल्याचे निदर्शक आहेत असे बहुतांश वर्तमानपत्रांचे मत आहे. पण शिवसेनेला तसे वाटत नाही.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना पत्रकार, राजकीय विश्लेषक भाजपचे कौतुक करत आहेत. आसाममध्ये सत्ता मिळवणा-या भाजपने केरळ, पश्चिम बंगाल या राज्यात चंचू प्रवेश केला आहे. हे निकाल म्हणजे भाजपचा देशभरात विस्तार होत असल्याचे निदर्शक आहेत असे बहुतांश वर्तमानपत्रांचे मत आहे.
पण शिवसेनेला तसे वाटत नाही. प्रादेशिक पक्षांचा पराभव भाजप करू शकला नाही हे सत्य मान्य करायला हवे असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे. सामनाच्या अग्रलेखातून भाजपच्या पाच राज्यातील कामगिरीवर टीकेचे आसूड ओढण्यात आले आहेत.
आसाममध्ये भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचा पराभव केला आहे, पण तामीळनाडूत जयललितांचा, प. बंगालात ममतांचा व केरळात डाव्यांचा पराभव भाजप करू शकला नाही. पुद्दुचेरीत काँग्रेसचा विजय झाला आहे. प्रादेशिक पक्षांचा पराभव भाजप करू शकला नाही हे सत्य मान्य करायला हवे. आसाम व केरळात काँग्रेसची सत्ता होती. ही राज्ये काँग्रेसने गमावली आहेत. काँग्रेसचा धुव्वा उडाला असे विश्लेषण होत आहे. मग आसाम वगळता इतर चार राज्यांत भाजपच्या बाबतीत काय झाले? असे सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.
काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात
- प. बंगालात भाजपने खाते उघडले यावरच समाधान मानायचे होते तर त्यासाठी देशाचे पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व संपूर्ण भाजप सरकारने प्रतिष्ठा पणास लावायची कारण नव्हते. केरळात आलटून पालटून सत्ताबद्दल होत असतो. कधी काँग्रेस तर कधी डावे असा आलटून पालटून खेळ सुरू असतो. त्या परंपरेने काँग्रेस गेली व डावे अवतरले. येथेही भाजपने जोर लावला, पण खाते उघडले हेच त्यांच्यासाठी ‘अच्छे दिन’ म्हणावे लागतील.
- तामीळनाडूत जयललितांच्या अण्णा द्रमुक पक्षाने सत्ता राखली, पण द्रमुकने येथे जोरदार टक्कर दिली. द्रमुक ३२ जागांवरून १०५ जागांपर्यंत पोहोचली. जयललितांना १२६ जागा मिळाल्या. ९२ वर्षांच्या करुणानिधींनी ‘‘ही शेवटची निवडणूक’’ म्हणून भावनिक आवाहन केले, पण तामीळनाडूतील जनतेने राज्य जयललितांकडेच सोपविले. तामीळनाडूतील निवडणुका म्हणजे ‘फुकट’, ‘मोफत’गिरीची स्पर्धा असते. मोबाईल, टीव्हीपासून मतदारांना सब कुछ मोफत देण्याच्या घोषणा होतात व निवडणूक आयोग येथे मूकबधिर होऊन बसलेला दिसतो. या सर्व राज्यांत भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले नाही व ‘मोदी मॅजिक’ येथे चालले नाही हे दुर्दैवाने म्हणावे लागेल.
- आसामातला विजय हा भाजपसाठी संजीवनी घेऊन आला. बिहार पराभवाचा खोलवर रुतलेला काटा या विजयाने निघाला आहे. आसामात काँग्रेसचे राज्य १५ वर्षे होते. तरुण गोगोई यांचे वय आता ८२ वर्षे आहे व मंत्रालयाऐवजी बराच काळ ते इस्पितळात असतात. आसामात बांगलादेशी घुसखोर व भूमिपुत्रांचा संघर्ष निर्माण झाला. त्यात काँग्रेस मतांच्या लाचारीपोटी बांगलादेशी मुसलमानांच्या मागे उभी राहिली. त्या संतापाचे प्रतिबिंब आसामच्या निकालात दिसले. आसाम गण परिषदेशी झालेली युतीही भाजपास फायद्याची ठरली. शिवाय आसाममधील भाजपच्या विजयाला इतर पक्षातून आलेल्या काही मंडळींमुळेही हातभार लागला. त्यांचाही फायदा भाजपला झाला. म्हणजे तेथे मूळ भाजपवाले किती आणि निवडणुकीपूर्वी बाहेरून आलेले किती हा भाग येतोच.