महाराष्ट्रात कायद्याचा बट्याबोळ; भाजपची ठाकरे सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 11:20 AM2020-02-04T11:20:07+5:302020-02-04T11:21:43+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कामकाज सोडून राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षासमोर लोटांगण घालत सुट्टीवर गेले असल्याची टीका सुद्धा भाजपने केली आहे.
मुंबई : जालन्याची घटना ताजी असतांनाचं वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे तरुण प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भररस्त्यात पेटवून दिल्याची संतापजनक घटना सोमवारी घडली. यावरून भाजपने ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने महाराष्ट्रात कायद्याचा बट्याबोळ करून ठेवला असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.
महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या शांतताप्रिय जिल्ह्याला सोमवारी हिंगणघाट येथील क्रूर घटनेने गालबोट लागले. महाविद्यालयात निघालेल्या २४ वर्षीय प्राध्यापक तरुणीला भर रस्त्यावर लोकांच्या समोरच पेट्रोल टाकून पेटवण्यात आले. प्राध्यापिका ४० टक्के जळाल्याने तिला नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आरोपीला नागपूर जिल्ह्यातून अटक केली आहे.
तर यावरून विरोधीपक्ष आक्रमक झाले असून, राज्यात कायद्याचा धाक उरला नसल्याची टीका होत आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांना दिल्लीतल्या गोळीबाराच्या घटना चिंताजनक वाटत आहे. मात्र कोल्हापूरमध्ये तरुण मुली गायब होत असून राज्यात बलात्काराच्या, खुनाच्या घटना घडत असताना त्याबद्दल बोलयला त्यांना वेळ नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
तर ठाकरे सरकारने महराष्ट्रात कायद्याचा बट्याबोळ करून ठेवला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कामकाज सोडून राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षासमोर लोटांगण घालत सुट्टीवर गेले असल्याची टीका सुद्धा भाजपने केली आहे.