“२०१९ ला राज्यात राष्ट्रपती राजवटीची आयडिया पवारांची होती”; फडणवीसांनी घटनाक्रम सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 07:00 PM2023-10-04T19:00:38+5:302023-10-04T19:00:52+5:30
Devendra Fadnavis News: NCP सत्ता स्थापनेस इच्छूक नसल्याचे पत्र माझ्याच घरी टाइप झाले. त्यात शरद पवारांनी दुरुस्त्या केल्यानंतर राज्यपालांना देण्यात आले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis News: सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात वेगवान आणि अचंबित करणाऱ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी घेतला होता. या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. या शपथविधीबाबत अद्याप अनेक गूढ कायम आहेत. याबाबत यापूर्वीही अनेकदा गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एक गौप्यस्फोट करून तेव्हा काय झाले होते, याचा घटनाक्रम सांगितला.
२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र, भाजपचा तत्कालीन मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने सरकार स्थापनेसाठी पक्षाला पाठिंबा देण्यास नकार देत दगा दिला. यामुळे सत्तेवर कोण येणार? असा प्रश्न निर्माण झाला. शरद पवारांनी भाजपशी संपर्क साधला होता. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपने युती करावी, असे सुचवले होते, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
२०१९ ला राज्यात राष्ट्रपती राजवटीची आयडिया पवारांची होती
शरद पवारांनीच राज्यात काही काळासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी सूचना केली होती. जेणेकरून राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांना भाजपशी युती करण्याबाबत माहिती मिळू शकेल. मात्र, सर्व वाटाघाटी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतली. राज्यात जेव्हा राष्ट्रपती राजवट लागू होते. तेव्हा प्रत्येक राजकीय पक्षाला सरकार बनवायचे आहे का? असे पत्र दिले जाते. राष्ट्रवादीला जे पत्र मिळाले, ते पत्र मीच लिहिले होते. ते माझ्या घरी टाईप करण्यात आले होते. या पत्रात शरद पवारांनी काही दुरुस्त्या सुचवल्या होत्या. त्या दुरुस्त्या केल्यानंतर राष्ट्रवादीही सरकार स्थापन करण्यास इच्छुक नाही, असे पत्र दाखल करण्यात आले. त्यानंतरच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली, असा मोठा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
दरम्यान, शिवसेनेसोबत (शिंदे गट) आमची नैसर्गिक युती आहे. तर अजित पवार आमचे राजकीय साथीदार आहेत. एकनाथ शिंदे आमच्यासोबत आल्याने महाराष्ट्रात पक्षाची ताकद वाढली. तसेच अजित पवारांनीही साथ दिल्याने राजकीय अंकगणितही चांगले झाले आहे. ६ महिन्यात परिस्थिती बदलत नसते. त्यामुळे, जेव्हा बनायचेय तेव्हा अजित दादांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच, सध्या एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आणि तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.