अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन; उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर चर्चा, पडद्यामागे काय घडते?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 01:22 PM2024-06-06T13:22:07+5:302024-06-06T13:23:36+5:30
BJP DCM Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले असून, अमित शाह यांच्यासह नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
BJP DCM Devendra Fadnavis News: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा एनडीए पक्षांना सोबत घेऊन सरकार बनवत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र, महाराष्ट्रात महाविकास आघाडीने महायुतीला चितपट केले. भाजपाला तर दोन आकडी संख्याही गाठता आले नाही. भाजपाच्या अनेक दिग्गजांना पराभव पत्करावा लागला. यातच या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दाखवली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील भाजपा नेते अमित शाहदेवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती देण्यात आली आहे.
भाजपाचा मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर मुंबईतील मुख्य पक्ष कार्यालयात भाजपाच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी काही आकडेवारी मांडत पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती पक्ष नेतृत्वाला केली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपासह महायुतीच्या अनेक नेत्यांनी गर्दी केली आणि आपला हा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली. सागर बंगल्याबाहेर भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी करत देवेंद्र फडणवीस यांना विनवणी केली.
अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली. या चर्चेमध्ये उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या मनात नेमके काय सुरू आहे, ते ऐकून त्यांच्या भावना शाह यांनी जाणून घेतल्या. सविस्तर माहिती घेतली. या मुद्यावर दिल्लीत आल्यावर प्रत्यक्ष भेटीत चर्चा करू, असे अमित शाह यांनी म्हटल्याचे सूत्रांकरवी समजते. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर मुक्कामी जात आहेत. या मुक्कामी दिल्लीतील कोणत्या नेत्यांच्या भेटीगाठी करतात आणि काय निर्णय होते याकडे लक्ष असेल.
दरम्यान, भाजपची संसदीय पक्षाची बैठक आहे. देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीत जात आहेत. दिल्ली भेटीत देवेंद्र फडणवीस अमित शाह यांच्यासह नरेंद्र मोदी यांचीही भेट घेऊ शकतात, अशी चर्चा आहे. राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांना, नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व हवे आहे. त्यामुळे दिल्लीतील बैठकीत काय होते, पदावरून मुक्त करण्याची देवेंद्र फडणवीस यांची मागणी मान्य होते का, नेते त्यांना काय मार्गदर्शन करतात, पुढे काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.