“मतभेद बाजूला ठेवा, महायुतीचा उमेदवार विजयी होईल तेवढे बघा”; देवेंद्र फडणवीसांच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 11:48 AM2024-03-25T11:48:16+5:302024-03-25T11:48:59+5:30

DCM Devendra Fadnavis News: काही मतदारसंघांवरून महायुतीत मतभेद असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपासह महायुतीच्या नेत्यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या आहेत.

bjp dcm devendra fadnavis give clear instructions to mahayuti leaders over lok sabha election 2024 | “मतभेद बाजूला ठेवा, महायुतीचा उमेदवार विजयी होईल तेवढे बघा”; देवेंद्र फडणवीसांच्या सूचना

“मतभेद बाजूला ठेवा, महायुतीचा उमेदवार विजयी होईल तेवढे बघा”; देवेंद्र फडणवीसांच्या सूचना

DCM Devendra Fadnavis News: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता अवघे काही दिवस राहिले आहेत. महायुती तसेच महाविकास आघाडीचे जाटावाटप आणि उमेदवारी अद्याप निश्चित होताना दिसत नाही. महाविकास आघाडी आणि महायुतीने काही जागांवर उमेदवारी जाहीर झालेली आहे. मात्र, विजय शिवतारे यांच्यासह अन्य नेत्यांच्या काही भूमिकांमुळे महायुतीत काहीसा तणाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही सूचना केल्याचे समजते.

महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप निश्चित होत नसताना महायुतीतील घडामोडींना वेग आला. जागावाटपाबाबत महायुतीची बैठक सुरू असतानाच महादेव जानकर यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला. तर काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यातच महायुतीतील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या दोन महत्वाच्या बैठका पार पडल्या, अशी माहिती देण्यात आली आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाच्या सूचना केल्याचे सांगितले जात आहे.

अंतर्गत मतभेदांवरून महायुतीच्या उमेदवारावर परिणाम होता कामा नये

अंतर्गत मतभेद बाजूला ठेवा आणि महायुतीसाठी कामे करा. महायुतीचे उमेदवार विजयी होतील, एवढेच बघा. बाकी सगळे बाजूला ठेवा. अंतर्गत मतभेदांवरून महायुतीच्या उमेदवारावर परिणाम होता कामा नये. मिशन ४५ प्लस यावरच संपूर्ण लक्ष ठेवा, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितल्याचे वृत्त आहे. तत्पूर्वी, बारामती लोकसभा मतदारसंघातील तिढा सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत बैठक पार पडली. तसेच नगर दक्षिणमधील वाद मिटवण्यासाठी राम शिंदे, सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतल्याचे म्हटले जात आहे. 

दरम्यान, बारामती मतदारसंघाचा वाद मिटवण्यासाठी सागर बंगल्यावर उशिरापर्यंत खलबतं सुरू होती, असे सूत्रांच्या वतीने सांगण्यात आले आहे. दुसरीकडे, विजय शिवतारे हे बारामीत लोकसभा लढवण्यावर ठाम आहेत. विजय शिवतारे यांनी भूमिका स्पष्ट करत, १२ एप्रिल रोजी १२ वाजता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे विजय शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे आदेश दिल्याचे समजते. 
 

Web Title: bjp dcm devendra fadnavis give clear instructions to mahayuti leaders over lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.