शरद पवारांच्या निवृत्ती निर्णयावर देवेंद्र फडणवीसांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 04:26 PM2023-05-02T16:26:03+5:302023-05-02T16:26:26+5:30
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी सावध प्रतिक्रिया दिली.
Devendra Fadnavis: राज्याच्या राजकीय वर्तुळात शरद पवारांनी त्यांच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होतानाच इथून पुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे शरद पवार यांनी जाहीर केले. लोक माझे सांगाती या शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथा पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईत झाला. त्यावेळी शरद पवार यांनी या घोषणा केल्या. यानंतर कार्यकर्ते, नेते अतिशय भावूक झाले. शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी आग्रही विनंती करण्यात आली. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून, भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावधपणे भाष्य केले आहे.
मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न आहे. यासंदर्भात चर्चा आणि मंथन सुरू असल्याचे दिसत आहे. पक्षातील निर्णय कोणत्या दिशेला जाईल, याचा अंदाज येत नाही. यासंदर्भात आता भाष्य करणे अगदीच घाईचे ठरेल. त्यामुळे यावर कोणतीही टिप्पणी करणार नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. योग्यवेळी यावर प्रतिक्रिया दिली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. याप्रकरणी संयम ठेवणे गरजेचे आहे. हे का होत आहे, कसे होत आहे, यापुढे काय घडणार आहे, या गोष्टीची निश्चिती होईल, तेव्हाच यावर भाष्य करू, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
मलाही एक पुस्तक लिहायचे आहे, योग्यवेळी लिहीन
शरद पवार यांच्या पुस्तकावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. यात पहाटेच्या शपथविधीविषयी शरद पवारांनी या पुस्तकातून भाष्य केल्याचे सांगितले जात आहे. यावरून देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, शरद पवार यांचे पुस्तक मी वाचलेले नाही. नेमके त्यात काय म्हटलेय, ते मला माहिती नाही. त्यामुळे यावर बोलणार नाही. मात्र, मलाही एक पुस्तक लिहायचे आहे. योग्यवेळी ते मी लिहीन. त्यांनी काय म्हटलेय, त्यावर मला काय वाटतेय, नेमके सत्य काय आहे, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत, त्या मी पुस्तक लिहिल्यावर तुम्हाला निश्चित कळतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, शरद पवारांचे लोक माझे सांगाती हे आत्मचरित्र चांगलेच गाजले. या पुस्तकाचा दुसरा भाग प्रकाशित झाला आहे. या दुसऱ्या भागात २०१५ पासून ते २०२३ पर्यंतच्या अनुभवी आणि प्रसंगारुप घटनांची माहिती शरद पवार यांनी लिहिली आहे. त्यातच, अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन केलेल्या शपथविधीवरही पवार यांनी खुलासा केला आहे. अजित पवारांनी उचललेले पाऊल अत्यंत गैर होत. माझ्या नावाचा वापर करून आमदारांना राजभवनात नेले, असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी या पुस्तकात केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"