उद्धव ठाकरेंशी आजही मैत्री आहे का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “२५ वर्षे युतीत होतो पण...”
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 08:14 PM2024-02-23T20:14:36+5:302024-02-23T20:14:41+5:30
Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray News: मित्र कोणाला म्हणतात? हा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारायला हवा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उठल्यापासून शिव्या नाही घातल्या तर त्यांना जेवण जात नसेल. त्यांचे काही लोक सकाळी उठल्यापासून सुरू होतात. राजकारणात काही इश्यू होत असतात. २५ वर्ष ज्यांच्यासोबत आम्ही सुख-दुःख वाटले असे लोक आमच्या नेत्याबाबत बोलतात तेव्हा हृदय तुटते, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना देवेद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवर अगदी सविस्तर आणि रोखठोक भाष्य केले. अजित पवार यांच्यासाठी आघाडी ही एक रणनीति आहे. तर एकनाथ शिंदेंसोबत आमची इमोशनल आघाडी आहे. प्रत्येक सरकारची कामाची एक वेगळी पद्धत असते. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून काम करत होतो. मुख्यमंत्री असताना जो अजेंडा चालवत होतो तो आता उपमुख्यमंत्री असताना चालवत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंशी आजही मैत्री आहे का?
उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या मैत्रीबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. मित्र कोणाला म्हणतात? हा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारायला हवा. त्यांनी ५ वर्ष केलेला प्रत्येक कॉल मी उचलला. त्यांनी सांगितलेले प्रत्येक काम केले, पण मी त्यांना फोन करत राहिलो. त्यांनी एकदाही कॉल घेतला नाही. आपली युती होऊ शकणार नाही, असे सांगायचे तर होते. आम्ही मित्र होतो तर उद्धव ठाकरेंनी माझा फोन उचलला पाहिजे होता. उद्धव ठाकरेंनी दरवाजा आणि रस्ता बंद केला होता. त्यानंतर आमचे कधी बोलणे झाले नाही. उद्धव ठाकरे मित्र होते. मला वाटते नाही आम्ही आता उद्धव ठाकरेंसोबत जाऊ. आम्ही मनाने वेगळे झालो आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझे आधीपासूनच चांगले संबंध आहेत. आम्ही एका प्रोजेक्ट्सवर काम केले आहे. ज्यावेळी मविआ सरकार बनले त्यावेळी एकनाथ शिंदे यांना वाटले हे योग्य नाही. विचारांशी तडजोड करणे त्यांना जमत नव्हते. उद्धव ठाकरे यांच्या वागण्याने लोक वैतागले होते, म्हणून त्यांच्यासोबतच्या लोकांनी निर्णय घेतला आणि आमच्यासोबत आले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.