“विरोधक जितक्या शिव्या देतील, पंतप्रधान मोदींना तितकाच मोठा विजय मिळेल”: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 05:34 PM2024-04-23T17:34:35+5:302024-04-23T17:34:45+5:30
Devendra Fadnavis News: उद्धव ठाकरेंची भाषणेही ठरलेली असतात. ते भाषण जसेच्या तसे बोलून दाखवू शकतो, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
Devendra Fadnavis News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सातत्याने सडकून टीका करताना दिसत आहेत. भाजपाकडूनही या टीकेला प्रत्युत्तर दिले जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांच्या टीकेवर पलटवार केला आहे.
हनुमान जन्मोत्सवानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी टेकडीलाइन येथील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विरोधकांकडून पंतप्रधान मोदी यांच्यावर केल्या जाणाऱ्या टीकेबाबत पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना, विरोधक निराश झाले आहेत. पराभवाच्या भीतीने विरोधकांनी आता शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आहे. जेव्हा जेव्हा पंतप्रधान मोदींना शिवीगाळ केली जाते, तेव्हा पंतप्रधान मोदी यांचा विजय मोठा होतो. विरोधक मोदींना जेवढ्या शिव्या देतील, तेवढेच लोकांचे मोदींप्रति असलेले प्रेम वाढेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आमच्यासाठी बुद्धी, तर विरोधकांकरिता सुबुद्धी मागितली आहे
बजरंगबली बुद्धीही देतात आणि शक्तीही देतात. आपल्या राज्यावर आणि देशावर संकटे येतात, ते दूर करण्याकरिता शक्ती मागितली आहे. तसेच आमच्यासाठी बुद्धी, तर विरोधकांकरिता सुबुद्धी मागितली आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी केलेले एक काम दाखवावे. अडीच वर्ष मुख्यमंत्री पद होते. पंचवीस वर्ष महानगरपालिका होती. तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय यांना काही येत नाही. यांची भाषणेही ठरलेली आहेत. उद्धव ठाकरेंचे भाषण जसेच्या तसे बोलून दाखवू शकतो, अशी कोपरखळी देवेंद्र फडणवीस यांनी मारली.