“शरद पवारजी, तुम्हाला खरेच माफी मागायची असेल तर...”; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 06:28 PM2024-04-24T18:28:24+5:302024-04-24T18:28:56+5:30
Devendra Fadnavis News: तुम्ही सातत्याने विदर्भावर अन्याय केला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Devendra Fadnavis News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र होताना दिसत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते प्रचार, मेळावे, बैठका यांवर भर देताना पाहायला मिळत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी केलेल्या विधानावरून आता भाजपाकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत बोलताना शरद पवारांच्या विधानावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
काही दिवसांपूर्वी अमरावतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे यांची अमरावतीत जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली. तसेच गेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना पाठिंबा देऊ चूक केली. पाच वर्षांपूर्वी चूक झाली. पण आता ही चूक दुरुस्त करायची वेळ आली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्याच सभेत प्रतिक्रिया दिली.
शरद पवारजी, तुम्हाला खरेच माफी मागायची असेल तर...
परवा शरद पवार आले होते. शरद पवार म्हणाले की, मागच्या वेळेस नवनीत राणा यांना पाठिंबा दिला होता. याबद्दल माफी मागतो. तुम्हाला माफी मागायची असेल तर विदर्भाची मागा, कारण तुम्ही सातत्याने विदर्भावर तसेच अमरावतीवर अन्याय केला. तुम्ही सातत्याने आम्हाला मागास ठेवले. मोदींच्या नेतृत्वात या ठिकाणी टेक्सटाईल पार्क आले. मोदींच्या नेतृत्वात रेल्वे स्टेशन सौंदर्यकरण आले. मोदींच्या नेतृत्वात या ठिकाणी अनेक गोष्टी आल्या. त्यामुळे तुम्ही माफी मागितली पाहिजे, पण जनेतेची मागितली पाहिजे. इतके वर्ष राजकारण केले, पण विदर्भाला काही दिले नाही, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
दरम्यान, तुम्ही १० वर्ष कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले. विदर्भात शेतकऱ्यांनी तुमच्या कार्यकाळात आत्महत्या केल्या आहेत, त्यांच्या कुटुंबियांची माफी मागा, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी केला. अमरावतीत नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते.