“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 06:19 AM2024-10-07T06:19:46+5:302024-10-07T06:21:13+5:30
काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील हे 'कोर्टात' जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होऊ नये म्हणून स्थगिती आणतात. याला काय म्हणावे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव (जि. बुलढाणा): संभाजीराजे रविवारी समुद्रात शिवस्मारक शोधायला निघाले, तसेच त्यांनी भाजपचा निषेध केला. या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, संभाजीराजे यांनी शिवस्मारकाला स्थगितीसाठी कोर्टात जाणाऱ्या वकिलाचाही निषेध करावा, असा टोला लगावला.
खामगावातील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, शिवस्मारक समुद्रात व्हावे, ही तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. संभाजी महाराजांनी भाजपचा निषेध केला. मात्र, या स्मारकाच्या विरोधात न्यायालयामध्ये जाऊन स्थगिती आणणारे कोण, ते कोणाचे वकील आहे, ते काँग्रेसचे अधिकृत प्रचारक आहेत, हेदेखील संभाजीराजेंनी पाहावे, काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील हे 'कोर्टात' जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होऊ नये म्हणून स्थगिती आणतात. याला काय म्हणावे, असा सवालही उपस्थित केला.