“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 12:57 PM2024-04-29T12:57:07+5:302024-04-29T12:57:25+5:30
Devendra Fadnavis: आम्ही राम राम केल्याचा एवढा राग ठाकरेंना का आहे, भारतात राम राम करायचे नाही, तर काय पाकिस्तानात जाऊन करायचे का, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Devendra Fadnavis News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा व्हावी, अशी सोलापूरकरांची मागणी होती. पंतप्रधान मोदी यांना आम्ही विनंती केली. या विनंतीला मान देऊन पंतप्रधान मोदी यांनी सोलापुरात येण्याचे मान्य केले. सगळ्या परिसरात उत्साह आहे, असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेच खरपूस शब्दांत समाचार घेतला.
पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांच्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आले. मोदींना मत म्हणजे विकासाला नाही, तर विनाशाला मत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देण्याचे कारण नाही. कारण पंतप्रधान मोदींनी केलेला विकास संपूर्ण देश पाहात आहे. उद्धव ठाकरेंना सवाल आहे की, तुम्ही केलेले विकासाचे एक काम दाखवा. तुम्ही जीवनात कधी विकास केला नाही. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना विकासकामे केली नाहीत. त्यांनी मोदींबाबत बोलणे म्हणजे सूर्याकडे तोंड करुन थुंकण्यासारखे आहे, अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्राचे दोन तुकडे करायचे आहेत. नरेंद्र मोदी खोट बोलत आहेत, त्यांचे हे खोटे बोलणे गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड होणार आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. यावर, संजय राऊत कोण आहेत, हे मला माहिती नाही. पण एवढेच सांगतो की, ठाकरे यांनी या मानसिकतेतून बाहेर आले पाहिजे की, ते म्हणजे महाराष्ट्र आहे, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
दरम्यान, आम्ही राम राम केल्याचा एवढा राग ठाकरे गटाला का आहे, भारतात राम राम करायचे नाही, तर काय पाकिस्तानात जाऊन करायचे का, असा सवाल करत, आम्ही राम राम करणारच. राम रामचे नारे आम्ही देणारच, असे ठाम मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.