“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 07:33 PM2024-05-02T19:33:22+5:302024-05-02T19:34:27+5:30
Devendra Fadnavis News: लोकांनी मन बनवलेले आहे की, देशात नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवायचे आहे. विरोधकांना जनता मतपेटीतूनच उत्तर देईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Devendra Fadnavis News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपासह महायुतीतील सर्वच पक्ष जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठिकठिकाणच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत. कोल्हापूर येथे पोहोचलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेवर पलटवार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी फोन करून उद्धव ठाकरे यांची चौकशी, विचारपूस करायचे, असे म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकांनी मन बनवलेले आहे की, देशात नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवायचे आहे. जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. देशासमोर मोदींचे संकट आहे, अशी टीका करण्यात आली होती. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. देशासमोरचे संकट पंतप्रधान नरेंद्र मोदी नाहीत. परंतु, त्यांच्यासमोरचे, त्यांच्या पक्षासमोरचे मोठे संकट नरेंद्र मोदी आहेत. कारण पंतप्रधान मोदी आल्यानंतर त्यांच्या पक्षाची अवस्था जी झाली, त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत आली आहे. त्यामुळे निश्चितच त्यांच्यासमोर नरेंद्र मोदी यांचे संकट आहे. बाकी संपूर्ण देशवासीयांचे प्रेम पंतप्रधान मोदींवर आहे. याचे उत्तर जनता मतपेटीतून देईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच मी जे बोललोय, ते सत्य बोललोय, त्यावर वारंवार बोलायची गरज नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.
मोदीजी नियमितपणे फोन करून उद्धव ठाकरे यांची विचारपूस करायचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरे आजारी असताना, रश्मी ठाकरे यांना फोन करून प्रकृतीची चौकशी करत होतो. त्यांनी मदत मागितली, तरी ती करण्यासाठी पहिल्या क्रमांकावर मी असेन, असे म्हटले होते. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी मुलाखत पाहिली नाही. परंतु, हे सत्य आहे. राजकारणात पक्ष वेगवेगळे असू शकतात. अडचणीच्या काळात, आजारपणामध्ये विचारपूस करणे ही आपली संस्कृती आहे आणि मोदीजी ती नेहमी पाळतात. त्यामुळे मला पूर्ण कल्पना आहे की, त्या काळात मोदीजी नियमितपणे फोन करून उद्धव ठाकरे यांची विचारपूस करायचे. काही लागले किंवा काही आवश्यकता असेल, तर विचारायचे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, निश्चितच संभाजीराजे यांनाचा आवमान झाला. छत्रपती घराण्याबद्दल आदर आहे असे सांगायचे अन् अटी शर्थी घालायच्या. सगळे जे काही केले ते अपमान करण्याकरिताच झाले, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.