“उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरेंना जागा, संजय राऊतांना नाही”; फडणवीसांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 08:35 PM2024-04-25T20:35:55+5:302024-04-25T20:36:48+5:30
BJP DCM Devendra Fadnavis News: विरोधकांना असे वाटते की, ही निवडणूक ग्रामपंचायतीची सुरु आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
BJP DCM Devendra Fadnavis News: विरोधकांना असे वाटते की, ही निवडणूक ग्रामपंचायतीची सुरु आहे. त्यांना याबाबत कल्पना नाही. मी त्यांना सांगू इच्छितो की, ही निवडणूक देशाचे नेतृत्व ठरवण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक आपला देश कोणाच्या हातात द्यायचा त्याची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये एकीकडे पर्याय नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्याबरोबर महायुतीमधील सर्व पक्ष आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधी आहेत. राहुल गांधी यांच्यामागे २६ पक्षांची खिचडी आहे, या शब्दांत भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली.
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांनी उमेदवारी अर्ज भरला. यानंतर महायुतीची जाहीर सभा पार पडली. या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले. विरोधकांच्या इंजिनमध्ये फक्त त्यांच्या परिवारासाठी जागा आहे. सामान्य माणसांसाठी जागा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सगळा भारत देश हाच त्यांचा परिवार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरेंना जागा
राहुल गांधी त्यांचे इंजिन दिल्लीकडे ओढतात, शरद पवार त्यांचे इंजिन बारामतीकडे ओढतात, उद्धव ठाकरे त्यांचे इंजिन मुंबईकडे ओढतात. शरद पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळे यांनाच जागा आहे. उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरे यांनाच जागा आहे, त्यामध्ये संजय राऊतांनाही जागा नाही, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी टोलेबाजी केली.
दरम्यान, आपल्या महायुतीचे इंजिन नरेंद्र मोदी आहेत. त्याला वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे लागले आहेत. त्यात गोरगरीब, आदिवासी, शेतकरी महिला, अल्पसंख्यांक, भटके विमुक्त, ओबीसी अशा सर्वांना बसण्याची जागा आहे. सर्वांना यामध्ये बसून ‘सबका साथ सबका विकास, म्हणत आपली विकासाची गाडी पुढे चालली आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.