नव्या संसद भवन उद्घाटनावरुन देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना चांगलेच सुनावले; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 08:36 PM2023-05-24T20:36:48+5:302023-05-24T20:37:43+5:30

Devendra Fadnavis: नवीन संसद भवन हे देशाची शान आहे. त्यामुळे देशाची ताकद दिसत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

bjp dcm devendra fadnavis slams opposition over new parliament inauguration ceremony row | नव्या संसद भवन उद्घाटनावरुन देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना चांगलेच सुनावले; म्हणाले...

नव्या संसद भवन उद्घाटनावरुन देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना चांगलेच सुनावले; म्हणाले...

googlenewsNext

Devendra Fadnavis: नवीन संसद भवनाचे उद्घाटन महामहीम राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांचे हस्ते व्हावे ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह इतर सर्वच विरोधी पक्षांनी केली. परंतु राष्ट्रपतींना या कार्यक्रमाला न बोलावता पंतप्रधानच नूतन वास्तूचे उद्घाटन करणार आहेत. २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. यावरून राजकारण तापले आहे. २० विरोधी पक्षांनी या उद्घाटन समारंभात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे. 

भाजपशिवाय इतर १७ पक्ष नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहेत. तर सध्या एआयएमआयएम आणि बीआरएसची स्थिती स्पष्ट नाही. मात्र, अशी माहिती समोर येत आहे की, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा अध्यक्षांनी नवीन इमारतीचे उद्घाटन केल्यास आमचा पक्ष सहभागी होईल, अन्यथा आम्ही बहिष्कार टाकू, असे म्हटले आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप होत असताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले.

नवीन संसद भवन हे देशाची शान आहे

लोकशाहीमध्ये अशाप्रकारचे कावीळ झाल्यासारखे वागणे हे अत्यंत अयोग्य आहे. मोदीजींना विरोध करण्याचा ज्यांना ज्वर चढला आहे असे लोक लोकशाहीच्या मंदिराच्या उद्घाटनालाही जात नाहीत. ते कारणे सांगत आहेत ती हास्यास्पद आहेत. यापूर्वी १९७५ ला लोकसभेच्या एनएक्स इमारतीचे उद्घाटन स्वर्गीय इंदिराजींनी केले होते. मग ते लोकशाही विरोधी होते का? यापूर्वी संसदेची जी भव्य लायब्ररी आहे त्याचे भूमिपूजन स्वर्गीय राजीव गांधींनी केले होते. ते लोकशाहीविरोधी होते का, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच नवीन संसद भवन हे देशाची शान आहे. जेवढ्या कमी वेळात हे तयार झाले आहे त्यामुळे देशाची ताकद दिसते आहे. जेवढ्या भव्यतेने हे संसद भवन तयार झाले आहे, जगासमोर भारताची ताकद आली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. 

दरम्यान, वर्षानुवर्षे नवीन संसद भवन निर्माणाची चर्चा व्हायची. ते कुणी बनवू शकले नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते संसद भवन बनवून दाखवले त्यामुळे कुठेतरी पोटात दुखत आहे आणि तेच दिसते आहे. विरोधी पक्षांनी जो निर्णय घेतला आहे त्यावरुन हेच दिसते आहे की त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. 
 

Web Title: bjp dcm devendra fadnavis slams opposition over new parliament inauguration ceremony row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.