भाजपने ठरविले, मित्रांची प्रतीक्षाच; विधानमंडळ समित्यांच्या ११ अध्यक्षांची नावे निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 06:01 IST2025-02-26T06:01:38+5:302025-02-26T06:01:57+5:30
भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांनी विधानसभा अध्यक्षांना सोमवारी पत्र दिले, त्यात ११ अध्यक्षांची नावे दिली.

भाजपने ठरविले, मित्रांची प्रतीक्षाच; विधानमंडळ समित्यांच्या ११ अध्यक्षांची नावे निश्चित
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधिमंडळाचे कामकाज अधिक परिणामकारक होण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विधानमंडळ समित्यांच्या ११ अध्यक्षांची नावे भाजपने निश्चित केली. मित्रपक्ष शिंदेसेना आणि अजित पवार गटाच्या वाट्याला आलेली अध्यक्षपदे कोणाला मिळणार, हे मात्र अद्याप निश्चित झालेले नाही.
भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांनी विधानसभा अध्यक्षांना सोमवारी पत्र दिले, त्यात ११ अध्यक्षांची नावे दिली. तीन पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकीत कोणत्या पक्षाला कोणत्या समित्यांचे अध्यक्षपद मिळणार, हे निश्चित करण्यात आले होते. विधानभवनाच्या सूत्रांनुसार, भाजपने आमच्याकडे नावे पाठविलेली आहेत. अन्य पक्षांकडून नावे आली, की एकत्रित नियुक्ती जाहीर करण्यात येईल. आम्ही आमची नावे लवकरच पाठवू, असे अजित पवार गटाच्या नेत्यांनी सांगितले.
विधानमंडळ समित्यांचे अध्यक्ष
समितीचे नाव अध्यक्षांचे नाव
सार्वजनिक उपक्रम समिती राहुल कूल
पंचायत राज समिती संतोष दानवे
अनुसूचित कल्याण समिती नारायण कुचे
अनुसूचित जमाती कल्याण समिती राजेश पाडवी
महिलांचे हक्क व कल्याण समिती मोनिका राजळे
इतर मागासवर्ग कल्याण समिती किसन कथोरे
मराठी भाषा समिती अतुल भातखळकर
विशेष हक्क समिती राम कदम
धर्मादाय खासगी रुग्णालयांची तपासणी समिती नमिता मुंदडा
आमदार निवास व्यवस्था सचिन कल्याणशेट्टी
आश्वासन समिती रवी राणा
कुणाला मिळते अध्यक्षपद?
मंत्रिपद न मिळालेल्यांना समित्यांचे अध्यक्षपद दिले जाते असा अनुभव आहे. भाजपची यादी पाहताना त्याची प्रचीती येते. लोकलेखा समिती ही अशी एकमेव समिती आहे की जिचे अध्यक्षपद हे विरोधी पक्षाला दिले जाते. त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
विधानसभेत विरोधी पक्षनेताही अद्याप ठरलेला नाही. अशात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून मुंबईत सुरू होत आहे.