अमित शहा देतील साखर कारखान्यांना नवसंजीवनी; भाजप शिष्टमंडळाने घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 06:11 AM2021-10-20T06:11:28+5:302021-10-20T06:13:21+5:30
राज्यातील भाजप नेत्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली अमित शहा यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. या शिष्टमंडळात देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह सहकार क्षेत्रातील जाणकार आणि अधिकारी उपस्थित होते.
- विकास झाडे
नवी दिल्ली : एफआरपीपेक्षा अधिक दर दिल्याने साखर कारखान्यांना प्राप्तिकर खाते नोटीस पाठवत आहे. हे थांबावे आणि यातील गुंतागुंत कायमस्वरूपी सोडता आली पाहिजे म्हणून आम्ही केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना नवसंजीवनी मिळेल, अशी आशा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. राज्यातील भाजप नेत्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली अमित शहा यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. या शिष्टमंडळात देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह सहकार क्षेत्रातील जाणकार आणि अधिकारी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, आम्ही राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचे प्रश्न अमित शहा यांच्यापुढे मांडले. त्या चर्चेनंतर सहकारी साखर कारखान्यांना नवसंजीवनी मिळेल, अशी खात्री त्यांनी दिली. एफआरपीपेक्षा जास्त दर दिलेल्या कारखान्यांना १५ ते २० वर्षांपासून प्राप्तिकर खात्याची नोटीस येत आहे. ती आताही आली आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी विनंती आम्ही अमित शहा यांना केली आणि याबाबत योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन शहा यांनी दिले आहे, असे फडणवीस म्हणाले.
२६ तारखेला पुन्हा बैठक!
२६ ऑक्टोबर रोजी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी पुन्हा बैठक बोलावली आहे, अशी माहिती माजी खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. साखर कारखान्याच्या कर्जाची पुनर्रचना करण्याची मागणी गेल्या काही महिन्यांपासून आहे. परंतु कोरोनामुळे यावर तोडगा निघू शकला नव्हता, असे ते म्हणाले.