आता भाजपा म्हणतेय, 'ठरल्याप्रमाणे करा'; शिवसेना म्हणतेय, 'तसं ठरलंच नव्हतं'!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 05:34 PM2019-11-18T17:34:45+5:302019-11-18T17:36:07+5:30
मात्र राज्यातील या नाट्याचा परिणाम कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळत आहे.
कल्याण - राज्यातील सत्तास्थापनेत अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची मागणी शिवसेनेने केली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी याबाबत अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत तसं ठरलं होतं असं वारंवार शिवसेनेकडून सांगण्यात येत होतं. मात्र भाजपाने मुख्यमंत्रिपदाबाबत काहीच ठरलं नव्हतं अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे राज्यात भाजपा-शिवसेनेचं बिनसलं आहे.
मात्र राज्यातील या नाट्याचा परिणाम कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळत आहे. केडीएमसीच्या २०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप युतीमध्ये ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार पाच वर्षांमध्ये एक वर्ष महापौरपद भाजपला देण्याचे ठरले होते. त्यानुसार, पहिली अडीच वर्षे महापौरपद शिवसेनेने भूषविल्यावर त्यानंतर ते एक वर्षासाठी भाजपकडे जाण्याची शक्यता होती. मात्र, राज्यातील सरकार बनविण्यासाठी नवीन समीकरण उदयास येत असताना शिवसेना महापौरपद भाजपाला सोडेल का याची शंका आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. यावेळी दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढविल्या होत्या. या निवडणुकीत शिवसेनेला ५३, भाजपला ४३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, मनसे ९, बसपा १, एमआयएम १ आणि अपक्ष ९ असे नगरसेवक निवडून आले. मात्र, निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपाने युती करून सत्ता स्थापन केली. शिवसेनेला अपक्षांचा पाठिंबा असल्याने त्यांचे संख्याबळ ५७ आहे. सत्तास्थापनेनंतर पहिली अडीच वर्षे महापौरपदाचा मान शिवसेनेला मिळाला. उर्वरित अडीच वर्षांमध्ये भाजपला एक वर्ष आणि दीड वर्ष शिवसेनेला असा युतीचा फॉर्म्युला ठरला होता.
दरम्यान, मे २०१८ मध्ये पहिल्या अडीच वर्षांचा महापौरपदाचा कालावधी संपुष्टात आल्यावर हे पद वर्षभरासाठी आपल्याला मिळेल, अशी भाजपला अपेक्षा होती. त्यावेळी भाजपने पदाचा दावा केला असता, शिवसेनेने महापौरपद आपल्याकडेच ठेवण्याचा चंग बांधला. यात शिवसेना यशस्वी ठरली होती. महापौरपदासाठी भाजपचा दावा असताना भाजपच्या कोअर कमिटीने पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महापौरपदाचा दावा सोडला होता.
कल्याणच्या महापौरपदासाठी एकनाथ शिंदे यांना दुखावणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पसंत केले नाही, अशा एक ना अनेक चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेकडून भाजपची उपेक्षा झाली असताना, आताही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. राज्यातील आणि केंद्रातील बिघडलेले वातावरण पाहता शिवसेना कल्याणचे महापौरपद सोडण्याची शक्यता नाही. मात्र भाजपाने आता ठरल्याप्रमाणे करा असा पवित्रा घेतला आहे तर असं काहीच ठरलं नव्हतं असा दावा शिवसेना करत आहे.
...तेव्हा विचार करू
यासंदर्भात शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भाजपला एक वर्ष महापौरपद देण्यासंदर्भात अद्यापपर्यंत कोणतीही बोलणी झालेली नाही, जेव्हा बोलणी होतील तेव्हा विचार करू, असे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.
ज्यावेळी केडीएमसीची निवडणूक झाली त्यावेळी झालेल्या युतीमध्ये एक वर्ष महापौरपद भाजपला देण्याचे ठरले होते. त्यानुसार शिवसेनेने ते द्यावे. राज्यातील बदलती परिस्थिती लक्षात घेता व अनिश्चितता पाहता, पुढे काय होईल हे माहिती नाही. ज्या पद्धतीने मित्रपक्ष वागेल त्याप्रमाणे पुढची दिशा ठरेल. - राहुल दामले, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक, माजी उपमहापौर, केडीएमसी