भाजपाप्रवेशाच्या लाटेला राजकारणाचा अटकाव
By admin | Published: November 2, 2016 12:34 AM2016-11-02T00:34:50+5:302016-11-02T00:34:50+5:30
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्य काही पक्षांमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या लाटेला पक्षांतर्गत राजकारणाने अटकाव केला
पुणे : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्य काही पक्षांमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या लाटेला पक्षांतर्गत राजकारणाने अटकाव केला आहे. थेट मुख्यमंत्र्यांकडेच याबाबत तक्रार करण्यात आल्याने त्यांनीच पुढील प्रवेश तात्पुरते थांबविले असल्याचे पक्षाच्या वर्तुळात बोलले जात आहे. पक्षातील हा सुप्त संघर्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उघड होऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात येत आहे.
खासदार संजय काकडे यांनी नगरसेवकांचे पक्षप्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने मुंबईतील त्यांच्या वर्षा बंगल्यावर घडवून आणण्यास सुरुवात केली. त्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांना नव्हती. पालिकेतील पक्षाचे गटनेते गणेश बीडकर मात्र त्याला उपस्थित होते. तिथेच पहिली ठिणगी पडली. बापट समर्थक कार्यकर्त्यांनी खासदार काकडे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यानंतरही काकडे यांनी आणखी दोन प्रवेश घडवून आणले. मात्र त्या वेळी पालकमंत्री उपस्थित असतील याची काळजी घेतली. मात्र तरीही बापट समर्थक कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही.
दरम्यानच्या काळात शहरातील काही गुन्हेगार कार्यकर्त्यांची छायाचित्रे थेट मुख्यमंत्र्यांसमवेत झळकली. त्याची चर्चा सुरू झाली. त्याच वेळी मुंबईत वर्षा बंगल्यावर झालेल्या नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाच्या वेळीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही व्यक्ती उपस्थित असल्याचे जाहीर झाले. त्यांची छायाचित्रेही झळकली. त्याचेच निमित्त करीत पालकमंत्री बापट यांनी मुख्यमंत्र्यांकडे पक्षप्रवेश कार्यक्रमांबाबत तक्रार केली व पुण्यात याची चुकीची चर्चा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सुरुवातीला मुख्यमंत्र्यानीच फ्रि हँड दिलेल्या खासदार काकडे यांना आता मुख्यमंत्र्यांनीच सबुरीचा सल्ला दिला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्याच सांगण्यावरून खासदार काकडे यांनी त्यांच्या प्रयत्नांतून प्रवेश झालेल्या नगरसेवक व त्या वेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे साधे असून त्यातूनही ते निर्दोष सुटल्याचे स्पष्टीकरण प्रसिद्धी माध्यमांना दिले. त्यानंतर मात्र आता पक्षप्रवेशाचे कार्यक्रम पूर्ण थंडावले आहेत. कार्यकर्त्यांमधील चर्चाही कमी झाली आहे.(प्रतिनिधी)
>भाजपात सध्या महापालिकेत आपली सत्ता आलीच असे वातावरण आहे. तसे झाले तर आपले नगरसेवक हवेत यासाठी नगरसेवकांची लॉबी तयार करण्याच्या प्रयत्नातूनच पक्षप्रवेश घडवून आणले जात असल्याची चर्चा आहे. अशी लॉबी असेल तर ती नंतरच्या कामांमध्ये उपयोगी पडू शकते असा विचार यामागे असल्याचे सांगण्यात येते.
पालकमंत्री बापट तसेच खासदार काकडे दोघांनाही पालिकेवर नियंत्रण हवे आहे. त्यादृष्टीने त्यांची पावले पडत आहेत. पक्षात अलीकडेच सक्रिय झालेल्या खासदार काकडे यांना राजकीयदृष्ट्या मर्यादा आहेत. तरीही अन्य काही बाबी त्यांच्या जमेला असल्याने त्यांनी कंबर कसली आहे.
आणखी बरेच नगरसेवक संपर्कात असून, येत्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांच्याच उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणणार असल्याचे काकडे जाहीरपणे सांगतात. तर दुसरीकडे बापटही पक्षात प्रवेश मिळाला याचा अर्थ उमेदवारी मिळाली असा होत नाही हे जाहीरपणे स्पष्ट करीत आहेत. दोघांमधील या सुप्त संघर्षामुळे पक्षप्रवेशाची लाट सध्या तरी थंडावली आहे.