Devendra Fadnavis: आज झुकला तर पुन्हा भगव्याचं दर्शन होणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 09:40 PM2022-04-09T21:40:34+5:302022-04-09T21:50:47+5:30
हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा भगव्या वस्त्रातील फोटो असायचा. त्या फोटोकडून उर्जा मिळायची पण आज त्याच फोटोवर सोनिया गांधी आणि त्यांचा हात दिसला त्याने वेदना झाल्या
कोल्हापूर – आमची लढाई माऊलीशी नाही, त्या माऊलीच्या मागे दडलेत त्यांच्याशी आमची लढाई आहे. माऊलींच्या नावाने ही जागा निवडून आणली तर २०२४ मध्ये काँग्रेसचा पंजा घेऊन पालकमंत्री याच मतदारसंघातून उभे राहणार आहेत. ही लढाई व्यक्तीची नाही तर विचारांची लढाई आहे. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला त्यांच्याशी लढाई आहे. राम काल्पनिक आहे असं म्हणणाऱ्यांशी लढाई आहे. ज्यांनी कलम ३७० हटवण्याला विरोध केला त्यांच्याविरोधात लढाई आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर निशाणा साधला. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ते कोल्हापूरात आले होते.
या भाषणात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोल्हापूरनं महाराष्ट्र केसरी खिताब पटकवला पण १२ तारखेला कोल्हापूर उत्तरची गदा भाजपाच्या नानांकडे सोपवण्याचं मतदारांनी ठरवलं आहे. छत्रपती शिवरायांचं या नगरीवर विशेष प्रेम होतं. शत्रूला शिवरायांनी जसं परतवून लावलं तसं महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाला कोल्हापूरकरांना पळवून लावलं पाहिजे. पावनखिंडीत केवळ ५०० मावळे १० हजार शत्रूंच्या सामोरे गेले. त्या पराक्रमाची ही भूमी आहे. महाराणी ताराराणी यांनी शत्रूंना झुंजवून ठेवले. कोल्हापूरमध्ये एका चौकात हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा भगव्या वस्त्रातील फोटो असायचा. त्या फोटोकडून उर्जा मिळायची पण आज त्याच फोटोवर सोनिया गांधी आणि त्यांचा हात दिसला त्याने वेदना झाल्या. कोल्हापूरकरांनी भगव्याला भक्कम साथ दिली. परंतु आज भगव्याची एलर्जी असणाऱ्यांमागे शिवसेना लागली आहे. ज्याच्या रक्तात लाल रक्तासोबत भगवा आहे. त्यांना आव्हान आहे. कोल्हापूर उत्तर हे भगव्याचं आहे. भगव्याकडे आलेच पाहिजे. आज झुकला तर पुन्हा भगव्याचं दर्शन होणार नाही असं सांगत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
तसेच काश्मीरात तिरंगा डौलात फडकतोय. काश्मीर फाईल्सचाही विरोध केला. हिंदूची कत्तल उघडपणे केली जात होती. माता भगिनींवर अत्याचार होत होती. त्यावेळी दिल्लीत काँग्रेसचं सरकार होते. तोंडावर बोट ठेवून हे सगळं पाहत आहे. हा इतिहास काश्मीर फाईल्सनं दाखवला म्हणून त्याचा धिक्कार हे करतात. ही निवडणूक साधी नाही. इतके वर्ष तुमच्या हाती सत्ता दिली तुम्ही काय दिवे लावले? कोल्हापूरचा टोल काढण्यासाठी मला आणि चंद्रकांत पाटलांना यावं लागलं. हे आंदोलन शेवटपर्यंत पोहचवण्याचं काम भाजपाने केला असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रात दहशतीचं वातावरण
महाराष्ट्रात दहशतीचं वातावरण आहे. सामान्य माणसांवर दंडुके चालवले जात आहे. परंतु तुमचा मुकाबला आम्ही करू आणि सर्वसामान्यांना सुरक्षा देऊ. महाराष्ट्रात सरकार नसून भ्रष्टाचार आहे. कोविड काळात सामान्य माणूस होरपळत होता. प्रत्येक व्यक्ती टाहो फोडत होता. पण बारमालक, दारू व्यावसायिकांसाठी सरकारनं करात सवलत दिली. हे बेवड्यांचे सरकार आहे का? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे.
शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळाले पण निधी नाही
पेट्रोल-डिझेल दरवाढीवर आंदोलन करताय. महाराष्ट्रात ५२ रुपये सरकार पेट्रोल डिझेलवर घेत आहे. भाजपाशासित राज्याने पेट्रोल डिझेलवरील कर कमी केला. केंद्राने शुल्क कमी केले. मात्र राज्य सरकारने एकही दमडी कमी केली नाही. शिवसेनेची गत अशी मुख्यमंत्री पद मिळाले परंतु अर्थसंकल्पात २० टक्केही निधी शिवसेनेच्या वाट्याला नाही. महाराष्ट्राला लुबाडण्याचं काम हे सरकार करत आहे.