“कोरोना काळात भाजप कार्यकर्ता थांबला नाही, पण शिवसेनेच्या अनेक शाखा कुलुपबंद होत्या”
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 08:19 PM2021-12-12T20:19:04+5:302021-12-12T20:22:17+5:30
आताचे सरकार एकही नवीन काम करत नाही. आम्ही असतो तर मेट्रोचे काम पूर्ण झाले असते, असा टोला लगावण्यात आला आहे.
मुंबई:महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष भाजप सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहे. यातच आता भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर टीका केली. कोरोना काळात भाजप कार्यकर्ता थांबला नाही. पण, शिवसेनेच्या अनेक शाखा कुलुपबंद होत्या, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी घणाघात केला.
भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. आताचे सरकार एकही नवीन काम करत नाही. आम्ही असतो तर मेट्रोचे काम पूर्ण झाले असते. कोरोना काळात शिवसेनेच्या अनेक शाखा कुलुपबंद होत्या. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ता थांबला नाही. तो रस्त्यावर उतरून मदत करत होता, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
गोपीनाथ मुंडे हे गरीबांचे आणि वंचितांचे नेते होते
गोपीनाथ मुंडे हे गरीबांचे आणि वंचितांचे नेते होते. ओबीसींना आवाज आणि नेता मुंडे यांनी दिला. पंतप्रधान मोदींनी नेहमी गरिबांचा विचार केला. हे नवीन सरकार नुसते घोषणा करते. गोपाळ शेट्टी यांनी सरकारविरोधात लढा चालू केला, तो आपण जिंकू. आताचे सरकार नवीन काही करत नाही. आम्ही असतो तर मेट्रोचे काम पूर्ण झाले असते. त्यांना एक रेघही पुढे ओढता येत नाही. ते जमत नसेल तर आम्ही सुरु केलेली कामे थांबवू नका, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
पेपरफुटीची सीबीआय चौकशी करा
परीक्षा जाहीर करायच्या आणि नंतर त्या पेपरफुटीच्या नावाखाली रद्द करायच्या. अशा प्रकारचा काळा कारभार सातत्याने सुरू आहे. एक परीक्षा यांना धड घेता येत नाही. मागे आरोग्य विभागाच्या परीक्षाही रद्द झाल्या. पेपर फुटला आणि त्याचा तार मंत्रालयापर्यंत गेलेली आहे. त्यामुळे या परीक्षांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. या सगळ्या कारभारामुळे राज्यातील तरुणांची प्रचंड ओढाताण सुरू आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणी कडक कारवाई केली पाहिजे. यामध्ये कोण दोषी आहे? कुणावर तरी दोषारोप झाला पाहिजे. मात्र कुणावरही दोषारोप होत नाही. मंत्री नामानिराळे, मुख्यमंत्री नामानिराळे. हे चालणार नाही. याबाबत फार मोठा रोष आहे. यावर कडक कारवाई व्हावी. आमची तर मागणी आहे या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.