Tauktae Cyclone: “राज्य सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी”; फडणवीसांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 05:16 PM2021-05-19T17:16:34+5:302021-05-19T17:18:17+5:30
Tauktae Cyclone: नुकसान मोठे आहे. राज्य सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
रायगड: कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठा तडाखा दिल्यानंतर तौक्ते चक्रीवादळ गुजरातमध्ये धडकले. यामुळे कोकणासह गुजरातमधील अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गेल्या २ ते ३ दिवसांपासून वीज गायब असून, शेकडो झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. नुकसान मोठे आहे. राज्य सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. (bjp devendra fadnavis demands immediate compensation for tauktae cyclone in raigad)
कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर अवघ्या वर्षभरातच पुन्हा कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्याला भेट दिली. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“फडणवीस, दरेकर कोकणात; मुख्यमंत्रीही संकटग्रस्तांचे अश्रू पुसतात, अर्थात स्क्रिनवरून”
भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी
निसर्ग चक्रीवादळाची भरपाई अजून मिळाली नाही, आता वर्षभरातच या नागरिकांना दुसरा फटका बसला आहे. रायगडमध्ये जे नुकसान झालंय, त्याचा आढावा आम्ही घेतला आहे. जवळपास ८ ते १० हजार घरांचे नुकसान झाले असून, विशेषत: ५ हजार हेक्टरमध्ये फळपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळी तांदूळ, इतर फळपिकांचे नुकसान झाले. जवळपास २०० शाळांचे नुकसान झाले आहे. २५ वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे, अशी माहिती देत सरकारने तातडीने भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
📍Raigad, Konkan
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 19, 2021
Started my Konkan region tour to know about the damages caused by #CycloneTauktae.
Reached Raigad Collector office in Alibaug.
Took a detailed info on measures taken by local administration & other Government agencies to assist local citizens in distress. pic.twitter.com/HrJkyCMvQP
१७२ गावांमध्ये वीजपुरवठा नाही
अजूनही १७२ गावांमध्ये ७० हजार घरे अशी आहेत ज्यांना वीज पूर्ववत झालेली नाही. विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. बोटींचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यांचाही पंचनामा करावा लागेल. कोळी बांधवांचे म्हणणे आहे की, निसर्गवेळी झालेल्या नुकसानीचे पैसे अजून मिळाले नाहीत. आता हे दुसऱ्यांदा नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ नुकसानभरपाईची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.