Devendra Fadnavis : "त्याग करावा लागतो, त्याशिवाय आपलं राज्य येत नाही"; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 'राज'कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 12:46 PM2022-07-05T12:46:51+5:302022-07-05T12:57:53+5:30
Devendra Fadnavis : नागपूर विमानतळावर फडणवीस यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित असून ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
मुंबई - नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज नागपुरात आगमन झाले. नागपूर विमानतळावर फडणवीस यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित असून ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. शहरातील विविध भागात फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. नागपूरला रवाना होण्याआधी देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "त्याग करावा लागतो, त्याशिवाय आपलं राज्य येत नाही" असं म्हणत फडणवीसांनी 'राज'कारण सांगितलं आहे.
"माझ्यामध्ये उत्साह तर आहेच पण त्याहीपेक्षा जबाबदारीची जाणीव आहे. त्यामुळेच ठीक आहे. सर्वांचाच उत्साह असल्याने मी स्वागत स्वीकारणार आहे. पण त्यानंतर लगेच कामाला लागणार आहे. कोणाची नाराजी नाही. सर्वांना समजतं की काही ना काही त्याग करावा लागतो, त्याशिवाय आपलं राज्य आणता येत नाही" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच "जे खूप जरूरी होतं महाराष्ट्रासाठी ते आता झालं आहे. त्यामुळे छान वाटतं आहे" अशी प्रतिक्रिया अमृता फ़डणवीस यांनी दिली. TV9 मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून रॅली ते धरमपेठेतील येथील फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत रॅली काढण्यात आली आहे. याप्रसंगी शेकडो कार्यकर्ते उपस्थित असून त्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. 'कोण आला रे कोण आला.. महाराष्ट्राचा वाघ आला', देवेंद्र फडणवीस यांचा विजय असो, अशा घोषणा दिल्या जात आहे. फडणवीस यांनीही हात उंचावून आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रेमपूर्वक स्वागत स्वीकारले.
दरम्यान, राज्यात सत्ताबदलानंतर फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, हा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वास होता. प्रत्यक्षात राजकीय खेळींमुळे कार्यकर्त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले व फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. यानंतर गृहमंत्री अमित शहा यांच्या छायाचित्राविना विविध ठिकाणी फडणवीस यांच्या समर्थनार्थ ‘होर्डिंग्ज’देखील लागले व ‘सोशल मीडिया’वर देखील फडणवीसांचा राजकीय ‘गेम’ झाल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत होते.