Devendra Fadnavis : "मुख्यमंत्र्यांनी अच्छे दिन सांगावे, म्हणजे..."; देवेंद्र फडणवीसांनी 'टोमणे सभा' म्हणत उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 08:24 AM2022-06-09T08:24:22+5:302022-06-09T08:35:01+5:30
BJP Devendra Fadnavis And Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. टोमणे सभा म्हणत खिल्ली उडवली आहे.
मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावर चौफेर हल्ला चढवला. औरंगाबादमध्ये शिवसेनेने जबरदस्त शक्तिप्रदर्शन करत आयोजित केलेल्या या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या हिंदुत्वाचे वाभाडे काढले. तसेच एकदा महागाईविरोधात भाजपाने गणेशोत्सवादिवशीच भारत बंदची घोषणा केली होती, हेच यांचं हिंदुत्व का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. यानंतर आता या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadnavis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. टोमणे सभा म्हणत खिल्ली उडवली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विटस केले आहेत. "शेतकऱ्यांना मदत केव्हा करणार? पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा कमी करणार?" असे सवाल विचारत निशाणा साधला आहे. "बांधावरची मदत ज्यांना स्मरत नाही, पेट्रोल-डिझेलचे दर जे स्वत: कमी करीत नाही, त्यांनी दुसर्यांना ‘अच्छे दिन’ सांगावे, म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि...! माझे पुन्हा सवाल आहेत, शेतकर्यांना मदत केव्हा करणार? पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा कमी करणार?" असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
असो,
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 8, 2022
संभाजीनगरचे नामकरण, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, विकासाची एखादी नवीन योजना... काही तरी ठोस मिळेल, अशी उगाच त्यांची अपेक्षा होती.
पण, संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर पुन्हा एकदा टोमणे आणि फक्त टोमणे !#टोमणेसभा
"असो, संभाजीनगरचे नामकरण, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, विकासाची एखादी नवीन योजना... काही तरी ठोस मिळेल, अशी उगाच त्यांची अपेक्षा होती. पण, संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर पुन्हा एकदा टोमणे आणि फक्त टोमणे!" असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी टोमणेसभा हा हॅशटॅग देखील वापरला आहे. औरंगाबादच्या सभेत यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने एकदा भारत बंद नारा दिला होता. शिवसेनासोबत होती म्हणून, नाहीतर त्यांची बंद करण्याची ताकद नाही. बंद घोषित करण्यासाठी जो दिवस निवडला, तो दिवस नेमका गणपतींच्या आगमनाचा होता. शिवसेनाप्रमुखांना मी विचारलं, तेव्हा ते आपण या बंदमध्ये सहभाही व्हायचं नाही, असं ते म्हणाले.
मी सुषमा स्वराज यांना फोन केला. त्यांना म्हटलं बंद दिवशी गणेशोत्स्व आहे. त्यामुळे आमची अडचण होणार आहे. तर त्या म्हणाल्या, गणपती तर दहा दिवस असतो. तेव्हा मी सांगितलं गणपतींच्या आगमनापासून आनंदोत्सवास सुरुवात होते. आपण नाही म्हणालो. माफ करा आम्ही या बंदमध्ये सहभागी होऊ शकत नाही, असं सांगितलं, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.
त्यावेळी तुम्ही ना हिंदूचे सण बघत नव्हतात, ना लोकांचा आनंद बघत होता. केवळ राजकारण करायचं म्हणून तुम्ही भारत बंद करत होता. भारत बंद म्हणजे बंद. गणपती आले काय गेले काय, हिंदूंचा सण आहे, काही का असेना आम्ही बंद करणार, अशी तुमची भूमिका होती. बाळासाहेबांची शिवसेना होती म्हणून तेव्हा हा बंद झाला नाही. शिवसेना नसती तर काय झालं असतं देव जाणो, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.